Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
बाप्पाच्या आगमनाची पुण्यात जय्यत तयारी; पाचही मानाच्या गणपतींच्या दिमाखात निघणार मिरवणुका, असे आहे नियोजन
Pune Ganeshotsav 2024: सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या मानाचे पाच गणपती आणि प्रमुख मंडळांच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठा दुपारपर्यंत होणार आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या मानाचे पाच गणपती आणि प्रमुख मंडळांच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठा दुपारपर्यंत होणार आहे. तत्पूर्वी, सर्वच मंडळांनी मिरवणुका काढण्याचे नियोजन केले असून, सनई-चौघड्यांचे मंगलस्वर, ढोल-ताशांचा गजर, तालांवर नाचणारे भगवे झेंडे, मर्दानी खेळांचे सादरीकरण अशा थाटात ‘श्रीं’चे स्वागत करण्यासाठी भाविक सज्ज झाले आहेत.
मानाचा पहिला श्री कसबा गणपती
मिरवणुकीला सुरुवात : सकाळी ८.१५ वाजता उत्सव मंडपातून (कसबा पेठ)
मिरवणूक मार्ग : फडके हौद, देवाजी बाबा चौक, दारूवाला पूल, रास्ते वाडा, जिवा महाले चौकामार्गे (अपोलो चित्रपटगृह) रास्ता पेठ येथे मूर्तीकार अभिजित धोंडफळे यांच्याकडून घेतलेली गणेशमूर्ती पारंपरिक चांदीच्या पालखीत विराजमान करण्यात येईल. त्यानंतर अष्टविनायकांपैकी एक श्री सिद्धटेक देवस्थानच्या प्रतिकात्मक मंदिरात बाप्पा विराजमान होतील.
मिरवणुकीत सनई चौघडा, बँड, तीन ढोल-ताशा पथके.
प्राणप्रतिष्ठेची वेळ : कोल्हापूर येथील श्री सिद्धगिरी मठाचे (कण्हेरी मठ) मठाधिपती आणि विश्वस्त अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या हस्ते सकाळी ११.३७ वाजता प्राणप्रतिष्ठा
मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी गणपती
मिरवणुकीला सुरुवात : सकाळी १० वाजता न. चिं. केळकर रस्त्यावरील मंदार लॉज चौकातून चांदीच्या पालखीतून प्रारंभ.
मिरवणूक मार्ग : मंदार लॉज चौक, कुंटे चौक, नगरकर तालीम चौक, अप्पा बळवंत चौकमार्गे उत्सव मंडपातील स्वानंद निवास गणेश प्रासादात प्राणप्रतिष्ठा.
मिरवणुकीत नगारावादन, बँडपथक, दोन ढोल पथके व शंख पथक.
प्राणप्रतिष्ठेची वेळ : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष गोविंददेवगिरी यांच्या हस्ते दुपारी १२.११ वा.
बाप्पाच्या आगमनाची पुण्यात जय्यत तयारी; पाचही मानाच्या गणपतींच्या दिमाखात निघणार मिरवणुका, असे आहे नियोजन
मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम मंडळ
मिरवणुकीला सुरुवात : सकाळी १०.३० वाजता फुलांनी सजविलेल्या गजरथावर विराजमान बाप्पाच्या मिरवणुकीला उत्सव मंडपातून प्रारंभ.
मिरवणूक मार्ग : गुरुजी तालीम मंदिर, गणपती चौक, लिंबराज महाराज चौक, अप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी चौक, बेलबाग चौकातून उत्सव मंडपातील गज महालात बाप्पा विराजमान होतील.
मिरवणुकीत नगारावादन, बँड, तीन ढोल-ताशा पथकांचा समावेश.
प्राणप्रतिष्ठेची वेळ : पुनीत बालन आणि जान्हवी धारिवाल-बालन यांच्या हस्ते दुपारी १.३१ वा.
मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती
मिरवणुकीला सुरुवात : तुळशीबागेतील श्रीराम मंदिरापासून प्रभू श्रीरामचंद्रांच्या पालखीतून सकाळी १० वा.
मिरवणूक मार्ग : गणपती चौक लक्ष्मी रस्त्याने नगरकर तालीम चौकातून उजवीकडे अप्पा बळवंत चौक, बुधवार चौक, बेलबाग चौक, लक्ष्मी रस्त्याने गणपती चौकातून तुळशीबागेत ओडिशातील पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिरातील गर्भगृहाची प्रतिकृती असलेल्या उत्सव मंडपात महागणपती विराजमान होतील.
मिरवणुकीत नगारावादन, दोन ढोल-ताशा पथकांचा समावेश.
प्राणप्रतिष्ठेची वेळ : उद्योजक कृष्णकुमार गोयल व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते दुपारी १२.३० वा.
मानाचा पाचवा केसरीवाडा गणेशोत्सव
मिरवणुकीला सुरुवात : न. चिं. केळकर रस्त्यावर रमणबाग प्रशाला चौकातून पारंपरिक पालखीतून सकाळी ९.३० वा.
मिरवणूक मार्ग : रमणबाग चौकापासून केसरीवाड्यापर्यंत.
मिरवणुकीत नगारावादन, दोन ढोल-ताशा पथके.
प्राणप्रतिष्ठेची वेळ : रोनक टिळक, डॉ. दीपक टिळक, डॉ. गीताली टिळक, रोहित टिळक, डॉ. प्रणती टिळक यांच्या हस्ते सकाळी ११.
प्रमुख गणपती मंडळे
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट
मिरवणुकीला सुरुवात : उत्सव मंडपापासून सकाळी ८.१० वाजता
मिरवणूक मार्ग : भाऊसाहेब रंगारी भवन, बुधवार चौक, अप्पा बळवंत चौक, फुटका बुरूज, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरापर्यंत.
मिरवणुकीत सात ढोल-ताशा पथके, नगारावादन, मर्दानी खेळ.
प्राणप्रतिष्ठेची वेळ : गायक कैलाश खेर यांच्या हस्ते दुपारी १२.३०.
पुणेकरांनो कृपया लक्ष द्या! गणेशोत्सवानिमित्त PMPच्या बस मार्गांत मोठे बदल, कसे असतील पर्यायी मार्ग?
अखिल मंडई मंडळ
मिरवणुकीला सुरुवात : मंडईतील शारदा-गजानन मंदिरापासून फुलांनी सजविलेल्या त्रिशूळ रथातून सकाळी १० वाजता.
मिरवणूक मार्ग : शारदा गजानन मंदिर ते उत्सव मंडप.
मिरवणुकीत बँड पथक, दोन ढोल-ताशा पथकांचे वादन.
प्राणप्रतिष्ठेची वेळ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर आणि त्यांच्या पत्नी अंजली काळकर यांच्या हस्ते दुपारी १२.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
मिरवणुकीला सुरुवात : मुख्य मंदिरापासून सिंह रथातून सकाळी ८.३० वाजता प्रारंभ.
मिरवणूक मार्ग : मुख्य मंदिर, अप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडईमार्गे उत्सव मंडपात.
मिरवणुकीत सहभाग : सनई-चौघडा, तीन बँड पथके, एका ढोल-ताशा पथकाचे वादन.
प्राणप्रतिष्ठेची वेळ : कर्नाटकातील हुमनाबाद येथील श्री दत्त सांप्रदायाचे श्री ज्ञानराज महाराज माणिकप्रभू यांच्या हस्ते सकाळी ११.११ वा.