Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नवरात्र २०२३: उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, देवीची संपूर्ण आरती

16

Devi chi Aarti In Marathi: नवरात्र सुरू झाली आहे. सर्वीकडे देवीच्या उत्सवाचा उत्साह आहे. १५ ते २३ ऑक्टोबर असा हा नवरात्रोत्सवाचा नऊ दिवसांचा उत्सव जल्लोषात आनंदात साजरा होत आहे. रोज देवीची यथासांग पूजा केली जाते सोबत आरतीही म्हटली जाते. तेव्हा देवीची उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ही संपूर्ण आरती.. रोज म्हणा.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णु तिचा हो ।
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो ।। ध्रु०।।

आश्विन शुद्ध पक्षीं अंबा बैसलि सिंहासनीं हो ।
प्रतिपदेपासुनी घटस्थापना ती करुनि हो ।
मूलमंत्रजप करुनि भोंवते रक्षक ठेवूनी हो ।
ब्रह्माविष्णु रुद्र आईचें पूजन करिती हो ।। १ ।।

द्वितीयेचे दिवशीं मिळती चौसष्ट योगिनी हो ।
सकळांमध्यें श्रेष्ठ परशुरामाची जननी हो ।
कस्तूरीमळवट भांगी शेंदूर भरुनी हो ।
उदोकारें गर्जती सकळ चामुंडा मिळुनी हो ।। २ ।।
उदो बोला उदो ।। ०।।

तृतीयेचे दिवशीं अंबे शृंगार मांडिला हो ।
मळवट पातळ चोळी कंठीं हार मुक्ताफळां हो ।
कंठींची पदकें कांसे पीतांबर पिवळा हो ।
अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो ।। ३ ।।
उदो बोला उदो ।। ०।।

चतुर्थीचे दिवशीं विश्र्वव्यापक जननी हो ।
उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंतःकरणी हो ।
पूर्णकृपें पाहसी जगन्माते मनमोहिनी हो ।
भक्तांच्या माऊली सुर ते येती लोटांगणीं हो ।। ४ ।।
उदो बोला उदो ।। ०।।

पंचमीचे दिवशीं व्रत ते उपांगललिता हो ।
अर्घ्यपाद्यपूजने तुजला भवानी स्तवितां हो ।
रात्रीचें समयीं करिती जागरण हरिकथा हो ।
आनंदे प्रेम तें आलें सद्भावें क्रीडतां हो ।। ५ ।।
उदो बोला उदो ।। ०।।

षष्ठीचे दिवशीं भक्तां आनंद वर्तला हो ।
घेऊनि दिवट्या हस्तीं हर्षे गोंधळ घातला हो ।
कवडी एक अर्पितां देसी हार मुक्ताफ़ळां हो ।
जोगवा मागतां प्रसन्न झाली भक्तकुळां हो ।। ६ ।।
उदो बोला उदो ।। ०।।

सप्तमीचे दिवशीं सप्तशंगगडावरी हो ।
तेथें तूं नांदसी भोंवति पुष्पें नानापरी हो ।
जाईजुईशेवंती पूजा रेखियली बरवी हो ।
भक्त संकटीं पडतां झेलुनी घेसी वरचे वरी हो ।। ७ ।।
उदो बोला उदो ।। ०।।

अष्टमीचे दिवशीं अष्टभुजा नारायणी हो ।
सह्याद्रीपर्वती पाहिली उभी जगज्जननी हो ।
मन माझें मोहिलें शरण आलों तुजलागुनी हो ।
स्तनपान देऊनि सुखी केलें अंतःकरणीं हो ।। ८ ।।
उदो बोला उदो ।। ०।।

नवमीचे दिवशीं नवदिवसांचें पारणें हो ।
सप्तशतीजप होमहवनें सद्भक्ती करुनी हो ।
षड्रस अन्नें नैवेद्यासी अर्पियली भोजनीं हो ।
आचार्य-ब्राह्मणां तृप्त केलें कृपें त्वा करुनी हो ।। ९ ।।
उदो बोला उदो ।। ०।।

दशमीच्या दिवशीं अंबा निघे सीमोल्लंघनीं हो ।
सिंहारुढ दारुण शस्त्रें अंबे त्वां घेऊनी हो ।
शुंभनिशुंभादिक राक्षसां किती मारिसी रणीं हो ।
विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणीं हो ।। १० ।।
उदो बोला उदो ।। ०।।

प्रियंका वाणी

लेखकाबद्दलप्रियंका वाणीमहाराष्ट्र टाइम्स मध्ये भविष्य सेक्शनसाठी कंन्टेंट रायटर म्हणून २ वर्षापासून काम करत आहे. वैदिक ज्योतिष, आर्थिक भविष्य, राशीभविष्य, अंक ज्योतिष, टॅरो कार्ड, पंचांग, धार्मिक विषय आणि, सण उत्सवासंबंधी अचुक माहिती घेऊन ज्ञान आणि अनुभवानुसार योग्य माहिती वाचकांपर्यंत पोहचवते. इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनल मध्ये काम करण्याचा अनुभव आहे, वॉइस ओवर देण्याचाही अनुभव आहे. वाचन करण्याची आवड आहे. धार्मिक, आध्यात्मिक कथा वाचणे आणि स्वरचित कविता लिहीण्याचीही आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.