Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांच्या आरोग्य सुविधेसह स्वच्छतेला प्राधान्य द्यावे – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार – महासंवाद
सोलापूर, दि. 05: – कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून लाखो वारकरी भाविक येतात. दिनांक 12 नोव्हेंबर 2024 रोजी कार्तिकी एकादशी असून यात्रेचा कालावधी दि. 02 ते 15 नोव्हेंबर 2024 असून, वारी कालावधीत येणाऱ्या वारकरी भाविकांच्या आरोग्य सुविधेसह स्वच्छतेला प्राधान्य देवून आवश्यक उपाययोजना तात्काळ कराव्यात अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या.
कार्तिकी यात्रा नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्यकार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम, जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावल, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले,प्रांताधिकारी सचिन इथापे, व्हीसीव्दारे मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मुख्यधिकारी प्रशांत जाधव, सां.बा. विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निंबकर यांच्यासह संबधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
कार्तिकी यात्रा सोहळा यशस्वी व निविघ्नपणे पारपाडण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी. नगरपालिकेने यात्रा कालावधीत स्वच्छतेसाठी जादा स्वच्छता कर्मचारी यांची उपलब्धता, टॉयलेट स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था आदी कामे तात्काळ करावीत. पोलीस प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे तसेच मंदीर समितीनेही जादा सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी. मंदीर समिती पत्राशेड, दर्शन रांग तसेच दर्शन रांगेमध्ये उभारलेल्या तात्पुरत्या उड्डाणपुलाचे स्ट्रक्चर ऑडीट, फायर ऑडीट व इलेक्ट्रीक ऑडीट करुन घ्यावे. आषाढी यात्रा कालावधीत भाविकांना ज्याप्रमाणे आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या होत्या त्याप्रमाणेच कार्तिकी यात्रा कालावधीतही सुविधा उपलब्ध करुन कार्तिकी यात्रा सोहळा पार पाडावा अशा सूचनाही विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, नगरपालिकेने शहरातील खड्डे तात्काळ बुजवावेत चंद्रभागा वाळवंटात अतिक्रमणे होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. आवश्यक ठिकाणी बॅरकेंटींग करावे. तसेच अन्न व औषध प्रशासनाने खाद्यपदार्थांची तसेच प्रसादलयाच्या दुकानांची तपासणी करण्यासाठी जादा पथकाची नेमणूक करावी.
मुख्यकार्यकारी अधिकारी श्री जंगम म्हणाले, कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांना आरोग्य सुविधा तात्काळ उपलब्ध व्हाव्यात यासाठी मुबलक औषध पुरवठ्यासह औषधोपचार केद्रांची व बाईक ॲब्युलन्सची संख्या वाढविण्यात आली असून तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच कार्तिकी यात्रा कालावधीत वाखरी येथे जनावरांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरत असल्याने जनावरांच्या औषधोपचार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथके नेमण्यात आली आहेत.
यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी कार्तिकी यात्रा कालावधीत प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली. तर मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांना जलद व सुखकर दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीकडून योग्य नियोजन करण्यात आले असल्याचे सांगितले तसेच नगरपालिका प्रशासनाकडून भाविकांच्या स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता. स्वच्छतेसाठी जादा हंगामी स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक, नदी पात्रातील स्वच्छता, तात्पुरते शौचालय व्यवस्था, 65 एकर येथे आवश्यक सर्व सुविधा भाविकांना उपलब्ध करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी प्रशात जाधव यांनी सांगितले.
0000