Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत – उप निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार – महासंवाद

8

पुणे, दि.7 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विशेष प्रयत्न करावेत; या दृष्टीने स्वीप अंतर्गत मतदान जागृती उपक्रमांवर भर द्यावा, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे उप निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार यांनी आज विभागातील निवडणूक यंत्रणांना दिले. मतदारांना मतदान केंद्रावर किमान आश्वासित सुविधा योग्यरित्या पुरविल्या जातील यासाठी योग्य व्यवस्थापन करावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

पुणे येथे आयोजित विभागांतर्गत सर्व जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांमधील निवडणूक पूर्वतयारीबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस भारत निवडणूक आयोगाचे उप निवडणूक आयुक्त संजय कुमार, प्रधान सचिव अविनाश कुमार, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, भारत निवडणूक आयोगाचे उपसचिव सुमनकुमार, अवर सचिव अनिलकुमार, राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पी. प्रदीप, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, सांगली जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे आदी उपस्थित होते.

शहरी भागात मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत, असे सांगून श्री. हिरदेश कुमार म्हणाले, मतदारांना आपल्या मतदान केंद्राची माहिती व्हावी यासाठी सर्व साधनांचा अवलंब करावा. मतदार चिठ्ठ्यांचे 100 टक्के आणि वेळेत वाटप करावे. पुणे जिल्ह्यात ‘आपले मतदान केंद्र जाणून घ्या- नो युवर पोलींग स्टेशन’ उपक्रम चांगल्या प्रकारे राबविला जात असून त्याप्रमाणे विभागातील इतर जिल्ह्यातही राबविला जावा. मतदारांना मोबाईल ॲपद्वारे मतदान केंद्रांची माहिती कशा प्रकारे पहावी याबाबत प्रचार प्रसिद्धी करावी.

सर्व मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, रॅम्प, विद्युत पुरवठा, सावली, दिव्यांग मतदार व ज्येष्ठ मतदारांसाठी व्हीलचेअर आदी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. मतदान केंद्रांवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवावी. आपल्या जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था चांगल्या प्रकारे राहील याची दक्षता घ्यावी. निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस विभागाने वाहनांची कसून तपासणी करावी. अवैध मद्य, अंमली पदार्थ, रोकड, मौल्यवान वस्तू आदींच्या वाहतुकीवर नजर ठेऊन आवश्यक तेथे ताब्यात घेण्याची, जप्तीची कारवाई करावी, असेही ते म्हणाले.

विभागातील सर्व निवडणूक निरीक्षकांनी नेमून दिलेल्या मतदार संघात भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पडेल याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही हिरदेश कुमार यांनी दिल्या.

श्री. सुमनकुमार म्हणाले, सायंकाळी लवकर अंधार पडत असल्यामुळे महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद यांनी आपल्या क्षेत्रातील विद्युतपुरवठा नसलेल्या मतदान केंद्रावर विद्युतपुरवठ्याची व्यवस्था करावी. पाच पेक्षा अधिक मतदान केंद्रे असलेल्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे. मतदानावेळी गर्दी होऊ नये यासाठी मतदारांच्या रांगाचे व्यवस्थापन करावे. निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता जपण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राजकीय पक्षांना सर्व टप्प्यांवर आवश्यक ती माहिती द्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोक्कलिंगम म्हणाले, मतदान केंद्रांवर आवश्यक ते सर्व दिशादर्शक, ठिकाणदर्शक फलक (सायनेजेस) असावेत. मतदारांना आपले मतदान केंद्र माहित असावे, यासाठी प्रयत्न करावेत. मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणीच्या दिवशी भरावयाचे सर्व नमुने, अहवाल व्यवस्थितरित्या भरुन वेळेत पोहोचतील आदी बाबींबाबत मतदान केंद्राध्यक्ष, मतदान केंद्र अधिकारी यांना व्यवस्थित प्रशिक्षण द्यावे. पाच पेक्षा अधिक मतदान केंद्रे असलेल्या इमारतीच्या ठिकाणी मतदारांना बसण्यासाठी बाकडे, खुर्च्या उपलब्ध करुन द्याव्यात. मतदानासाठी घरुन येण्यासाठी व जाण्यासाठी वाहनाची मागणी केलेल्या दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांना ही सुविधा उपलब्ध करुन द्यावी, असेही ते म्हणाले.

निवडणुकीत उभे असलेलले उमेदवार, राजकीय पक्ष यांना निवडणूक प्रक्रियेची वेळोवेळी माहिती देऊन पारदर्शकता राहील याकडे लक्ष द्यावे. त्यांच्या सूचना घ्याव्यात, तक्रारींचे वेळेत निराकरण होईल याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही श्री. चोक्कलिंगम यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी डॉ. दिवसे पुणे जिल्ह्यातील तयारीबाबत सादरीकरण करताना म्हणाले, जिल्ह्यात मतदार चिठ्ठ्याचे शंभर टक्के वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. एकाच इमारतीत पाचपेक्षा अधिक मतदान केंद्रे असलेल्या ठिकाणी सर्व मतदान केंद्रांवर समसमान मतदारसंख्या असेल अशी रचना करण्यात आली आहे. मतदानावेळी रांगाच्या व्यवस्थापनासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आवश्यक तेथे राखीव मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असे ते म्हणाले.

बैठकीस पुणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निरीक्षक, खर्च निरीक्षक तसेच पोलीस निवडणूक निरीक्षक, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते. इतर पाच जिल्ह्यातील निवडणूक निरीक्षक, सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार, सातारचे समीर शेख, सोलापूरचे अतुल कुलकर्णी, कोल्हापूरचे महेंद्र पंडीत, सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह निवडणूक प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

0000

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.