Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कुटुंब रंगलंय प्रचारात, रॅलींमध्ये हजेरी, कार्यकर्त्यांचीही ‘चाय पे चर्चा’

6

Thane Vidhan Sabha Campaign Rally: वहिनी प्रचारयात्रेला येणार आहेत…दादांची बाईक रॅली संध्याकाळी निघणार आहे….ताईंसोबत महिला घरोघरी पत्रक वाटायला जाणार आहेत, असे संवाद सध्या ठाण्यात सर्वपक्षीय कार्यालयात घुमत आहेत.

महाराष्ट्र टाइम्स

विनीत जांगळे, ठाणे : वहिनी प्रचारयात्रेला येणार आहेत…दादांची बाईक रॅली संध्याकाळी निघणार आहे….ताईंसोबत महिला घरोघरी पत्रक वाटायला जाणार आहेत, असे संवाद सध्या ठाण्यात सर्वपक्षीय उमेदवारांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांच्या चर्चेत कानावर पडत आहेत. विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सर्वत्र जोरदार सुरु असताना उमेदवारांचे कुटुंबीय प्रचारफेऱ्या, रॅली, पदयात्रेत सक्रिय झाले आहेत. एकीकडे उमेदवारांचे कुटुंबीय प्रचार दौऱ्यांना हजेरी लावत असताना पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चाय पे चर्चा करत विविध खाद्य पदार्थांचा आस्वादही घेत आहेत. या कृतीमुळे ‘कुटुंब रंगलंय प्रचारात’ असे चित्र दिसून येत आहे.

चौकारासाठी प्रयत्नशील

ओवळा-माजिवडा मतदारसंघातून सलग तीन टर्म प्रताप सरनाईक विधानसभेवर निवडून गेले आहेत. यंदा विजयी चौकार मारण्यासाठी या मतदारसंघात पायाला भिंगरी लावून सरनाईक फिरत असताना त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका परिषा सरनाईक, सुपुत्र माजी नगरसेवक पूर्वेश, विहंग, सुना अनाहिता व डॉ. कश्मिरा यांनीही प्रचारयात्रांना हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे, रेयांश, विरहान, समर हे सरनाईक यांचे नातू प्रचार रथावर कुटुंबासोबत दिसत असल्याने सरनाईक कुटुंबाची तिसरी पिढी प्रचाररॅलीत सहभागी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी – पाचपाखाडी मतदारसंघातही त्यांच्या पत्नी लता शिंदे, स्नुषा वृषाली शिंदे, बंधू प्रकाश शिंदे यांनी प्रचार फेऱ्यांमधून नागरिकांशी संवाद साधला आहे.

विजयासाठी जीवाचे रान

लोकसभेतील पराभवाचे उट्टे काढण्यासाठी माजी खासदार व ठाणे शहर मतदारसंघाचे शिवसेनेचे (उबाठा) उमेदवार राजन विचारे प्रयत्नशील आहेत. संमिश्र लोकवस्तीच्या या मतदारसंघात विचारे यांच्या पत्नी माजी नगरसेविका नंदिनी विचारे, कन्या युवासेनेच्या सहसचिव धनश्री विचारे व माजी नगरसेवक पुतणे मंदार विचारे नागरिकांच्या गाठीभेटी घेत आहेत. दुसरीकडे ओवळा-माजिवडा मतदारसंघांचे शिवसेनेचे (उबाठा) उमेदवार नरेश मणेरा यांचे सुपुत्र मितेश मणेरा, कन्या हिनाली मणेरा प्रचारासोबतच प्रचाराच्या नियोजनात लक्ष देत असून कार्यकर्त्यांशी चर्चा करताना दिसत आहेत.

नागरिकांशी चर्चा, महिलांशी संवाद

मुंब्रा-कळवा विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस (शप) उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा आव्हाड यांनी मतदारसंघातील कळवा, मुंब्रा परिसरात प्रचारयात्रांवर भर दिला आहे. गल्लीबोळात पायी फिरून आव्हाड यांच्या कामाचा अहवाल, प्रचारपत्रके वाटप करताना नताशा या भागातील नागरिकांशी संवाद साधत आहेत. तसेच महिलांशी चर्चा करताना त्यांचे प्रश्नही नताशा जाणून घेत आहेत. या मतदारसंघातील जितेंद्र आव्हाड यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीब मुल्ला यांच्यासाठी मुंब्र्यातील नातेवाईक, आप्तेष्ट प्रचारात सक्रिय झाले असून सर्वत्र काटे की टक्कर असल्याने प्रत्येकजण आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी जीवाचे रान करत आहे.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.