Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
बेकायदेशीर होर्डिंगप्रकरणी मनसे नेत्याच्या मागणीला यश; ठाण्यात कारवाईचा बडगा, जाहिरातदारांना पाचपट दंड
Thane Illegal Hoarding Action : ठाण्यात बेकायदेशीर होर्डिंगवर मोठी कारवाई करण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करुन उभारलेल्या जाहिरातदारांवर दंड ठोठावण्यात आला आहे.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर मनसे नेत्याची कारवाईची मागणी
घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर अनेक वर्षे ठाणे पालिकेची फसवणूक करणाऱ्या होर्डिंग व्यवसायिकांसह, चुकीचा स्थळ पाहणी अहवाल देणाऱ्या जाहिरात विभागातील अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी मनसे विधानसभा विभागाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली होती. मात्र त्यानंतर कारवाई न झाल्याने पाचंगे यांनी न्यायालयात धाव घेत जनहित याचिका दाखल केली.
बेकायदेशीर होर्डिंगविरोधात कारवाईचा बडगा
अखेर अशा होर्डिंगवरील कारवाईला गती मिळाली असून पालिकेने ही कारवाई करण्यासाठी पावले उचलली आहेत. या कारवाईमुळे बेकायदेशीर होर्डिंग रोखण्यास मदत होईल आणि शहराचे सौंदर्यही टिकून राहील. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होणार नाही. होर्डिंग्जच्या नियंत्रणाबाबत ठोस धोरण आखण्याची आणि त्याची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे मत पाचंगे यांनी व्यक्त केले आहे.
बड्या कंपन्याही कचाट्यात
घाटकोपर दुर्घटनेनंतर सर्वत्र होर्डिंग्जच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात असताना ठाणे महापालिकेने केलेली ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जाते. यामध्ये बड्या होर्डिंग कंपन्यांचीही नावे असून संबंधित कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पाचंगे यांनी केली आहे.
दरम्यान, यावर्षी मे महिन्यात घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपाजवळ उभारलेलं अनधिकृत १०० बाय १२० असं भलंमोठं होर्डिंग कोसळून ६० जण जखमी झाले होते, तर जवळपास १४ जणांचा यात मृत्यू झाला होता. या होर्डिंग मालकाला पालिकेने नोटीस बजावली होती, तरीदेखील होर्डिंग काढण्यात आलं नव्हतं. त्याशिवाय सेफ्टी ऑडिटदेखील करण्यात आलं नसल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर जाहीरातदारावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.