Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
स्वीपच्या माध्यामातून १७ नोव्हेंबरला आयोजित ‘वोटाथॉन’ मध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम – महासंवाद
नाशिक, दि.13 नोव्हेंबर, 2024 (जिमाका वृत्तसेवा): महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये नागरिकांनी जास्तीत जास्तीत संख्येने मतदान करावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद नाशिक व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 17 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 वाजता ‘वोटोथॉन’ चे आयोजन केले आहे. या ‘वोटोथॉन’ मध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. तसेच 20 नोव्हेंबर 2024 रोजी प्रत्येक नागरिकांनी आवर्जून मतदान करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आज सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत विभागीय आयुक्त डॉ.गेडाम बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या नोडल अधिकारी आशिमा मित्तल, नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त (प्रशासन) लक्ष्मीकांत साताळकर, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, तहसीलदार मंजुषा घाटगे, अमोल निकम यांच्यासह अधिकारी व पत्रकार उपस्थित होते.
‘स्वीप’च्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडून मतदार जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हावासियांनी 20 नोव्हेंबर रोजी घराच्या बाहेर पडून मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवावा. मतदान झाल्यावर सेल्फी काढून सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरांनाही प्रोत्साहित करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी केले.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार असून जास्तीत जास्त नागरिकांना स्वीपच्या माध्यमातून मतदानास प्रोत्साहीत करण्यासाठी व त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वोटोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. यात तीन किलोमीटर व पाच किलोमीटर अशा दोन मॅरेथॉन होणार आहेत. या वोटॉथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी आयोजन समितीकडून https://wwww.surveymonkey.com/r/qrcode/MHVXR5M हि रेजिस्ट्रेशन लिंक व QR Code जाहीर करण्यात आला असून नोंदणी विनाशुल्क आहे. तसेच प्रथम नोंदणी करणाऱ्या 750 सहभागी स्पर्धकांना व्होटिंग अँम्बेसेडर टी शर्ट देण्यात येणार असून मतदार जनजागृतीसाठी संदेश देणारे,विशेष पोशाख परिधान करणाऱ्या स्पर्धकांना समितीच्या वतीने बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मित्तल यांनी यावेळी विषद केली. वोटोथॉन मध्ये सहभागी होतांना नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहनही श्रीमती मित्तल यांनी यावेळी केले.
असा आहे वेाटोथॉनचा मार्ग
3 किलोमीटर- महात्मा नगर ग्राऊंड- डॉ.बी.एस.मुंजे मार्ग- भोसला महाविद्यालय सर्कल मार्गे कॉलेजरोड- कृषी नगर मार्गे- सायकल सर्कल- Six sigma हॉस्पिटल- परत महात्मा नगर ग्राऊंड आणि समारोप
5 किलोमीटर- महात्मा नगर ग्राऊंड- डॉ.बी.एस.मुंजे मार्ग- भोसला महाविद्यालय सर्कल मार्गे जेहान सर्कल, गंगापूर रोड – विवेकानंद मार्ग- पूर्णवाद नगर- प्रसाद सर्कल- कॉलेज रोड- कृषी नगर- सायकल सर्कल- Six sigma हॉस्पिटल- परत महात्मा नगर ग्राऊंड आणि समारोप
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटोथॉन पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
0000000