Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Mumbai News: मुंबईतील सर्वात महागडा परिसर म्हणून दक्षिण मुंबईची ओळख आहे. मात्र या ठिकाणी असलेल्या गिरगाव चौपाटीवर चटई क्षेत्र फक्त ३० रुपयांत दिले जाते.
मुंबई: दक्षिण मुंबई हा शहरातील सर्वाधिक महागडा परिसर. पण इथल्या गिरगाव चौपाटीवरील ‘चटई’क्षेत्र अवघ्या ३० रुपयांत दिले जात असेल तर…? होय, हे खरे आहे. पण, हा जमीन खरेदी व्यवहारातील चटईक्षेत्राचा भाव नसून, चौपाटीवर फिरायला येणाऱ्यांना पुरवल्या जाणाऱ्या चटयांचे भाडे आहे.
‘उद्योगपंढरी’ असे बिरूद मिरवणारी मुंबापुरी कष्ट करणाऱ्या कुणालाही उपाशी ठेवत नाही, असे म्हटले जाते. पावलोपावली हे सिद्धही झाले आहे. फक्त यासाठी हवी ती मेहनत घेण्याची तयारी आणि या मायानगरीत टिकून राहण्यासाठी थोडी अनोखी ‘आयडियाची कल्पना’. हे दोन्ही गुण अंगी असलेल्यांमध्ये व मुंबईची ओळख अधोरेखित करणाऱ्यांमध्ये दिसराजसिंग भदोरिया यांचा आवर्जून समावेश होतो.
मध्य प्रदेशमधील भिंड जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या दिसराजसिंग यांनी इतर लाखो लोकांप्रमाणेच उदरनिर्वाहाच्या आशेने मुंबईची वाट धरली. पण इथे येऊन करणार काय? शिक्षण अगदीच जुजबी. मेहनतीची तयारी असली तरी विशेष असे कौशल्यगुण आत्मसात नाहीत. मग करायचे काय? गिरगाव चौपाटीवर मावळत्या सूर्याकडे बघत भविष्याच्या विचारात मग्न असताना, त्यांच्या डोक्यात अचानक एका कल्पनेचा उदय झाला.
चौपाटीवर आजूबाजूला अनेक लोक फिरायला आले होते. मध्यमवर्गीयांपासून उच्चभ्रूंपर्यंत. फेरफटका मारून थोडे थकल्यासारखे वाटल्यानंतर अनेकांना इथल्या गार वाळूत बसावेसे वाटे. पण कपडे खराब होतील किंवा कीटक-मुंग्यांचा त्रास होईल, या भीतीने अनेकजण मग मनात नसतानाही घरचा रस्ता धरत. पोटाची खळगी भरणे अशक्य होते, तेव्हा एका टप्प्यावर मानवी मेंदू साधारण क्षमतेपेक्षा जास्त तल्लख होतो, असे म्हणतात. दिसराजसिंग यांच्या बाबतीतही बहुदा असेच झाले. चौपाटीवर येणाऱ्यांची ही अडचण त्यांच्या मेंदूने अवचित हेरली. त्यातूनच मग डोक्यात आली, अशा लोकांना बसण्यासाठी चटई पुरवण्याची कल्पना… मागील ४० वर्षांपासून दिसराजसिंग हे काम करताहेत. त्यावेळी चारआण्याला ते चटई देत. कालानुरूप आज हा भाव ३० रुपये झालाय. एवढ्या पैशात तुम्हाला कितीही वेळ चौपाटीवर ठाण मांडता येते.
दरमहा १५ हजार रुपयांची कमाई!
सूर्य मावळतीकडे झुकू लागला की दिसराजसिंग यांच्या कामाची सुरुवात होते. मग रात्री १२, तर कधी १पर्यंत ते हा पुरवठा करतात. सध्या त्यांच्याकडे २५ ते ३० चटया आहेत. प्रेमीयुगुले आणि कुटुंबे हे त्यांचे हक्काचे ग्राहक. यातून महिन्याला सुमारे १५ हजार रुपयांची कमाई होते, असे दिसराजसिंग सांगतात.