Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पैसे वाटपाच्या आरोपावरुन विनोद तावडे संतापले,’…अन्यथा मानहानीचा दावा ठोकेन,’ थेट काँग्रेस नेत्यांना धाडली नोटीस
Vinod Tawde Notice Congress Leaders: भाजप नेते विनोद तावडेंनी पैसे वाटप केले असल्याचा कथित व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. यावरुन काँग्रेससोबतच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी तावडेंना अनेक प्रश्नांनी घेरले होते. आता, विनोद तावडेंनी थेट काँग्रेस नेत्यांना नोटीस बजावली आहे.
या सर्व प्रकारावर विनोद तावडेंनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘मी येथील कार्यकर्त्यांना मतदानासंदर्भात काही मार्गदर्शन करण्यासाठी आलो होतो. पण बहुजन विकास आघाडीच्या लोकांना माझ्यासंदर्भात काही गैरसमज झाला. त्यांनी सर्व तपासून पाहिले पण काही मिळाले नाही. त्यांनी सीसीटिव्ही फुटेज देखील तपासावे.’ असे विनोद तावडे म्हणाले होते. पण हितेंद्र ठाकूर आपल्या आरोपांवर ठाम होते. ते म्हणाले, ‘विनोद तावडे पैसे घेऊन येणार आहेत, असे मला भाजपच्या लोकांकडूनच कळाले. पण विनोद तावडे मोठे नेते असल्याने ते असं छोटं काम करणार नाही असं मला वाटलं होतं पण माझे कार्यकर्ते हॉटेलमध्ये गेले तेव्हा तेथे पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरु होता. यावेळी नेमकं सीसीटिव्ही फुटेज देखील बंद होते. पण आमचे कार्यकर्ते पोहोचताच ते चालू करण्यात आले. याबद्दल हॉटेल मालकाची चौकशी झाली पाहिजे.’
भाजप, काँग्रेसचा पराभव व्हावा ही तर त्यांच्याच मित्रपक्षांची इच्छा; मोठा गेम करण्याची तयारी
दरम्यान, काँग्रेससोबत विरोधी पक्ष नेत्यांनी भाजप नेते विनोद तावडेंवर टीकेची झोड उठवली आणि यावरुन भाजपला देखील घेरले. पण विनोद तावडेंनी पैसे वाटपाचे आरोप फेटाळून लावले आणि आता तावडेंनी काँग्रेस नेत्यांनी रीतसर नोटीस बजावली आहे. नोटीसची प्रत आपल्या एक्स हँडलवर पोस्ट करत विनोद तावडे म्हणाले, ‘काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट यांना मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे. कारण त्यांनी या प्रकरणात खोटेपणा पसरवून माझी आणि भारतीय जनता पक्षाची प्रतिमेला धक्का लावण्याचे काम केले आहे.’
विनोद तावडेंकडून काँग्रेस नेत्यांना इशारा देखील देण्यात आला. पुढील २४ तासांत बिनशर्त माफी मागावी, अन्यथा मी १०० कोटींच्या मानहानीचा दावा ठोकणार, असे तावडे म्हणाले. तसेच, मी ५ कोटी रुपये वाटल्याचे आरोप बिनबुडाचे असल्याचे स्पष्टीकरण देखील तावडेंनी दिलं आहे.