Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

ठाकरेंच्या पठ्ठ्यानं केली कमाल ! निकाला आधीच काढली ‘विजय रॅली’,महायुतीचं टेन्शन वाढलं

2

| Updated: 22 Nov 2024, 1:40 pm

Dapoli Vidhansabha :ठाकरे गटाच्या उमेदवाराने निकालाआधी विजय मिरवणुक काढल्याने महायुतीची चिंता वाढली आहे.या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे मात्र हा वाढलेला एक टक्का हा कोणत्या उमेदवाराला विजयी रथापर्यंत नेतो हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

रत्नागिरी: अवघ्या कोकणचं लक्ष लागून राहिलेल्या दापोली विधानसभा मतदारसंघात ‘कॉंटे की टक्कर’ होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेनेचे नेते, माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र व विद्यमान आमदार, योगेश कदम यांच्यासमोर ठाकरे गटाचे उमेदवार माजी आमदार, संजय कदम यांनी मोठं आव्हान उभं केलं आहे. या मतदारसंघात योगेश कदम यांचा विजय निश्चित मानला जात असतानाच आता ठाकरे गटाचे उमेदवार संजय कदम, यांनी ही निकाला आधीच विजय रॅली काढून “आपला विजय निश्चित असून पोलिसांचा रिपोर्ट शासनाकडे गेला आहे” असं वक्तव्य केल्याने या मतदारसंघातलं महायुतीचे टेन्शन वाढलं आहे. या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे मात्र हा वाढलेला एक टक्का हा कोणत्या उमेदवाराला विजयी रथापर्यंत नेतो हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे.

हम साथ साथ हैं ?

कोकणात दापोली मतदारसंघात शिवसेना भाजपा मधील वाद हे सर्वश्रुत होते. मात्र निवडणुकीच्या दरम्यानच मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी ते मिटवण्यात आले होते. त्यामुळे महायुतीने एकत्र काम केलं होतं. पण असं असलं तरीही महायुतीमधीलच भाजपच्या एका महिला पदाधिकारी यांनी मात्र दाभोळ गटात आमदार योगेश कदम यांच्या विरोधातच भूमिका घेतल्याची उघड चर्चा दापोलीत सुरू असून त्या महायुतीच्या एकाही बैठकीला उपस्थित राहिलेल्या नाहीत. त्यामुळे दाभोळ जिल्हापरिषद गटात महाविकास आघाडीच्या संजय कदम यांना बळ मिळालं आहे. इतकंच नाही, तर काही गणितं फिरवण्यात आल्याचीही दापोलीत जोरदार चर्चा आहे. त्यामुळे दापोली विधानसभा मतदारसंघ हा अचानक चर्चेत आला असून या ठिकाणी ‘कॉंटे की टक्कर’ होणार असल्याचे चित्र आहे. मात्र महायुती मधील वाद मिटल्यानंतर भाजपाचे नेते जिल्हाध्यक्ष, केदार साठे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी सक्रिय भूमिका घेत काम केल्याचे चित्र पाहायला मिळालं. इतकंच नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही या निवडणुकीत आपली यंत्रणा महायुतीच्या विजयासाठी कार्यरत केली होती.

विकासाचे मुद्दे,गद्दारीची टीका

मनसेचे नेते, खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांची या सगळ्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका राहिली असून मनसेचे उमेदवार संतोष अबगुल हे किती मते घेतात याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत आमदार योगेश कदम यांची, प्रचारात केलेल्या विकासकामांच्या मुद्द्यांवर व पर्यटन, उद्योग, रोजगार या विषयावर भर देत आघाडी होती. तर संजय कदम यांच्याकडूनही पर्यटन, उद्योग, रोजगार या विकासाच्या मुद्द्यावर भूमिका मांडत रामदास कदम यांच्यावर टीका करत गद्दारी हे मुद्दे घेऊन प्रचारात भर ठेवण्यात आला होता. दरम्यान दापोली, खेड, मंडणगड, विधानसभा मतदारसंघात लक्ष्मी दर्शनानंतर अचानक काही गणितं फिरल्याची चर्चा सुरू आहे. काहींनी आपले राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी एका रात्रीत लक्ष्मीदर्शन घेत गणितं फिरवल्याची चर्चा असून या सगळ्यामुळे महाविकास आघाडीला या निवडणुकीत मोठे बळ मिळण्याची शक्यता आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार व माजी आमदार संजय कदम महायुतीचे उमेदवार व विद्यमान आमदार योगेश कदम यांच्यात हा मुख्य सामना रंगणार असून उद्याच्या निकालाकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाच्या, सर विश्वेश्वरय्या सभागृहात ही सगळी मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून दापोली मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अजित थोरबोले व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अर्चना बोंबे व त्यांचे प्रशासन तसेच पोलीस यंत्रणा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी सज्ज झाली आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.