Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Maharashtra Election Results : पक्षाच्या सुमार कामगिरीबाबत आता पक्षश्रेष्ठींकडून दखल घेण्यास सुरुवात झाली आहे. त्याच अनुषंगाने काँग्रेस हायकमांडने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिल्लीत बोलवले
पक्षाच्या सुमार कामगिरीबाबत आता पक्षश्रेष्ठींकडून दखल घेण्यास सुरुवात झाली आहे. त्याच अनुषंगाने काँग्रेस हायकमांडने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिल्लीत बोलवले असून, रविवारी सकाळीच नाना पटोले दिल्लीला रवाना झाल्याचे कळते.
संघटनात्मक बदलांचे संकेत
नाना पटोले त्यांच्या दिल्लीच्या भेटीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. पक्षातील अतंर्गत गटबाजीलाही तोंड फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर पक्षात अनेक संघटनात्मक बदलांचे संकेत आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे आत्मपरीक्षण सुरू झाले असून या पराभवाची जबाबदारी कोण घेणार, यावर चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर त्या पक्षाच्याच राष्ट्रीय प्रवक्त्यांनी थेट तोफ डागल्याने येत्या काळात हे युद्ध रंगण्याची चिन्हे आहेत.
Nanded By Poll : 800 मतांनी काँग्रेस जिंकली, भाजपचा आक्षेप, फेरमोजणीत लीड थेट 1457 वर, नांदेड पोटनिवडणुकीत गेम कसा फिरला?
विमानं, हॉटेल व्यवस्थाही होती सज्ज
लोकसभा निवडणुकीतील मोठ्या यशानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांना विधानसभा निवडणुकीमध्येही तसेच यश मिळण्याची अपेक्षा होती. निकालाच्या आदल्या दिवशी काँग्रेसच्या विजयी आमदारांना नागपूरहून थेट मुंबईमध्ये आणण्यासाठी विशेष विमान सज्ज करण्यात आले होते. त्याचप्रमाणे मुंबईतील एका पंचतारांकित हटिलमध्ये या सगळ्यांची निवासव्यवस्था करण्यात आल्याची माहितीही काँग्रेसचे नेते देत होते.
विरोधीपक्ष नेतेपदही हुकलं
निवडणुकीआधी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यामध्ये मुख्यमंत्री कोण, यावरून कलगीतुराही रंगला होता. मात्र निकालानंतर सगळेच चित्र बदलले. काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. सत्तास्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठी आवश्यक दहा टक्के आमदारांची संख्याही गाठता आलेली नाही.
या पराभवाच्या धक्क्यातून अनेक नेते अजूनही सावरलेले नाहीत. संभाव्य मुख्यमंत्री म्हणून नाव असलेले बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर यांचा पराभव काँग्रेसच्या वर्मी लागला आहे. पटोले यांनाही विजयासाठी शेवटच्या फेरीपर्यंत झगडावे लागले. राज्यातील या पराभवानंतर नाना पटोले यांना तातडीने दिल्लीमध्ये पाचारण करण्यात आले. तेथे काही ज्येष्ठ नेत्यांशी ते दिवसभर चर्चा करीत होते.
प्रवक्त्यांचा पटोलेंवर निशाणा
दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी या पराभवाची जबाबदारी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनीच घ्यायला हवी, असे जाहीर वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले. सना मोहम्मद यांची भूमिका पक्षनेतृत्वाच्या आदेशानुसार आहे की, त्यांचे वैयक्तिक मत आहे, याचा खुलासा झाला नसला, तरीही या मोठ्या पराभवाची जबाबदारी राज्यातील नेत्याला घ्यावी लागणार, हे पुरेसे स्पष्ट आहे. त्यामुळे येत्या काळात बळीचा बकरा कोण ठरणार, याचीच चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे.
मोहम्मद यांनी पटोले यांना थेट लक्ष्य करताना काँग्रेसचा विविध गॅरंटी असलेला कार्यक्रम मतदारांपर्यंत नेण्यामध्ये प्रदेशाध्यक्ष व प्रदेशातील नेते कमी पडल्याचेही म्हटले आहे. ‘काँग्रेसने महिलांना दरमहा तीन हजार रुपये, त्याशिवाय मोफत प्रवास, मोफत गॅस सिलिंडर, तसेच विविध योजना जाहीर केल्या होत्या, या सगळ्याची बेरीज केली, तर दरमहा जवळपास आठ हजार रुपयांचे फायदे महिलांपर्यंत पोहोचविण्याची काँग्रेसची योजना होती.
अमित ठाकरेंच्या पराभवाला सरवणकर जबाबदार की उद्धव काका? आकड्यांनी उत्तर दिलं!
पण या योजना प्रचाराच्यादरम्यान चर्चेतच आणल्या गेल्या नाहीत. प्रदेशाध्यक्ष व त्यांच्या संघाने प्रचारामध्ये या मुद्द्याकडे लक्षच दिले नाही’, असा थेट आरोप मोहम्मद यांनी केला आहे. राहुल गांधी यांच्या निकटवर्ती असलेल्या सना मोहम्मद महिनाभर महाराष्ट्रात तळ ठोकून होत्या. अनेक राष्ट्रीय वाहिन्यांवरील चर्चेमध्ये त्या काँग्रेसची बाजू हिरीरीने मांडत होत्या. त्यामुळे त्यांनी असे थेट आरोप करणे हे गंभीर असल्याची चर्चा काँग्रेस नेत्यांमध्ये रंगली आहे.