Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Ashutosh Kale vs Snehalata Kolhe Battle in Kopargaon: तीन पिढ्यांचा राजकीय संघर्ष मात्र कोपरगावातील दोन्ही मातब्बर नेते महायुतीमध्ये असल्याने कोल्हे परिवाराने कट्टर राजकीय विरोधक असलेले आशुतोष काळे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला आहे. महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी झाले मात्र आता कोल्हेंना त्यांचे निष्ठेचे फळ मिळणार का? अशी चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे.
राज्यात महायुती सरकार असल्याने कोपरगाव मतदारसंघ राष्ट्रवादी पक्षासाठी सोडणे किंवा मैत्रीपूर्ण लढत करून पुढे जाणे असे पर्याय भाजपसमोर होते. खात्रीशीर निवडून येणारी जागा कोल्हे यांच्या नावाने गृहीत धरली जात होती. विवेक कोल्हे या युवा नेतृत्वाला अनेक पक्षातून गळ टाकण्याचा प्रयत्न सारेच करत होते. कारण येथे २०१९ला विवेक यांच्या मातोश्री स्नेहलता कोल्हे यांचा अवघ्या ८२२ मतांनी पराभव झाल्यानंतर कोल्हे कुटुंब आणि खास करून विवेक कोल्हे यांनी मतदारसंघ पुन्हा कसा खेचून आणता येईल यासाठी बांधणी केली होती. नाशिक शिक्षक निवडणुकीत विवेक कोल्हे यांनी पाच जिल्ह्यात अवघ्या वीस दिवसांत उभी केलेली यंत्रणा राज्याचे लक्ष वेधून घेणारी ठरली. त्यापूर्वीच्याही त्यांच्या राजकीय भूमिका उल्लेखनीय ठरल्या आहेत. स्नेहलता कोल्हे यांनी २०१४ पासून भाजपचे संघटन जिल्ह्यात उभे होण्यासाठी अनेक योजना आणि पक्ष धोरण राबवण्यात मोलाचे काम केले, हेच भाजपाने हेरले होते. त्यामुळे या कुटुंबाला भविष्यातील ध्येयधोरण लक्षात घेता सोबत ठेवले. पक्षाच्या पातळीवर निरीक्षक केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्नेहलता कोल्हे यांना विधानसभेत एकच उमेदवार देऊन आपण त्यास विजयी करण्यात पुढाकार घेण्यास चर्चा केली. त्यानंतर कोल्हे यांनी पक्षाच्या हितासाठी दोन पावले मागे येण्याचा मोठा निर्णय घेतला. अमित शाह यांनी विवेक यांची दखल घेऊन दिल्लीत चर्चा केली त्यानंतर कोल्हे यांनी कधी नव्हे तो पन्नास वर्षात प्रथमच निवडणुकीत थांबण्याचा निर्णय घेतला.
महायुतीच्या मोठ्या कमबॅकनंतर मविआचे ईव्हीएमविरोधी कार्ड, पण तिथे सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय
कार्यकर्त्यांच्या मनधरणीसाठी प्रयत्न
काळे कोल्हे असा अनेक वर्षांचा संघर्ष असल्याने कोल्हे यांचे कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे दिवाळी फराळाच्या निमित्ताने त्यांनी निवासस्थानी पंचवीस हजारांहून अधिक कार्यकर्त्यांचा फराळ कार्यक्रम घेत सविस्तर चर्चा केली आणि मन वळविण्याचा प्रयत्न केला. तरीही कोल्हे नाही तर काळे नको असा सूर असणारा वर्ग वाढत होता. यातच गिरीश महाजन यांनी फराळ कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यकर्त्यांना कोल्हे यांच्यासाठी पक्षाने मोठा विचार केला असल्याचे सूतोवाच केले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून विवेक कोल्हे यांच्यासारखा उमदा तडफदार तरुण युवानेता राज्यात जनसेवा करण्यास गरजेचा आहे आणि पुढील अनेक वर्ष पक्षासाठी हा नेता चांगले काम करू शकतो यावर भाष्य केले. कार्यकर्ते भाजपसोबत होते पण स्थानिक पातळीवर असणारा अनेक वर्षांचा संघर्ष कसा विसरून काळे यांना मतदान करायचे म्हणून कार्यकर्ते बुचकळ्यात पडले होते. त्यात कोल्हे कारखाना गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी बिपीन कोल्हे आणि विवेक कोल्हे यांनी आपल्या रक्तात गद्दारी नाही,जो शब्द दिला तो जपणे आपले काम आहे. सर्वांनी घड्याळाला कमळ समजून मतदान करा, असे आवाहन केले. याशिवाय सर्व संस्था, प्रमुख कार्यकर्ते यांच्या बैठका घेत पडद्यामागे गाजावाजा न करता कार्यकर्त्यांची मानसिकता बदलण्यात कोल्हेंना यश आले.
कोल्हेंच्या हक्काच्या गावात काळेंना लीड
माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी महसूल,सहकार,परिवहन अशी मंत्रिपदे भूषवली होती.त्यांचा स्वभाव देखील जे पोटात तेच ओठात असा होता.बिपीन कोल्हे,स्नेहलता कोल्हे आणि आता तिसऱ्या पिढीतील विवेक कोल्हे यांनीही विश्वासाचे दुसरे नाव कोल्हे हा ब्रँड निर्माण केला.कोल्हे यांनी शिंगणापूरसह आपल्या हक्काच्या गावातून काळे यांना मताधिक्य दिले आहे. कोल्हे यांनी महायुतीच्या उमेदवाराचे प्रामाणिकपणे काम केल्याचे आकडेवारीतून सिद्ध होत आहे.
युतीधर्म पाळल्याने काळेंना मोठे मताधिक्य
युतीचे काम होवूनही काहीं मतदारसंघात मताधिक्य आणि विजयाच्या जवळ जावून जागा निसटल्या गेल्या तसे कोपरगावमध्ये घडले नाही.उदाहरण म्हणजे वडगाव शेरीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे पराभूत झाले तिथे शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे निवडून आले या ठिकाणी भाजपाचे जगदीश मुळीक यांनी तयारी केलेली होती. त्यांनीही वेळेवर युतीचा धर्म पाळला मात्र ती जागा पराभूत झाली.हडपसर मतदारसंघ अजितदादा गटाचे चेतन तुपे ७ हजार मतांनी विजयी झाले तिथे भाजपाचे योगेश टिळेकर हे यांनी युतीधर्म जपला अशी उदाहरने आहेत जिथे युती असून मताधिक्य मात्र फार प्राप्त करता आले नाही त्या तुलनेत कोपरगाव मात्र विक्रमी ठरले यावरून कोल्हे यांनी पाच वर्षे निवडणुकीची कसून केलेली तयारी थेट काळे यांच्या मदतीला आली आणि सिंहाचा वाटा उचलत महायुतीच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला.आता कोल्हे यांच्या बाबतीत भाजपा कशावर शिक्कामोर्तब करणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.