Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

हेमंत सावरांची मागणी अखेर पूर्ण! वसई रोड स्थानक होणार टर्मिनस, रेल्वेमंत्र्यांचा हिरवा कंदील

4

Vasai Road Railway Terminal: यापूर्वी २०१८मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी वसईत रेल्वे टर्मिनस उभारण्याची घोषणा करून ते २०२३पर्यंत पूर्ण करण्याचा दावा होता. मात्र त्याचे पुढे काहीही झाले नाही.

हायलाइट्स:

  • वसई रोड स्थानक होणार टर्मिनस
  • रेल्वेमंत्र्यांचा हिरवा कंदील
  • रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नुकतीच घोषणा
महाराष्ट्र टाइम्स
वसई रोड रेल्वे टर्मिनस बातम्या

पालघर : वसई रोड रेल्वे स्थानक हे पश्चिम रेल्वेच्या लोकलवरील महत्त्वाचे स्थानक असून, ते आता टर्मिनस बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत नुकतीच घोषणा केली. वसई, विरार, नालासोपारा, नायगाव किंबहुना मीरा-भाईंदर ही महापालिका क्षेत्रे झपाट्याने विस्तारत असून, देशाच्या विविध भागांतून येणारे नागरिक मोठ्या संख्येने या भागात राहतात. संपूर्ण वर्षभर या भागातील प्रवासी विविध सण, उत्सव, लग्न समारंभ, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी रेल्वेने प्रवास करतात. वसई रोड स्थानकातून भारताच्या उत्तर आणि दक्षिण भागासाठी सुपर फास्ट, राजधानी आणि दुरांतो इत्यादी एक्स्प्रेस धावतात. तथापि, स्थानकावरून कोकणासह दक्षिण भारत आणि उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, पंजाब, दिल्ली, हरियाणासाठी थेट गाडी नाही. यामुळे स्थानिकांना सीएसएमटी, एलटीटी, मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस गाठावे लागते. त्यासाठी लोकलमधील गर्दीमुळे एक ते दोन तास उभ्याने प्रवास करावा लागतो.वसई रोडवरून टर्मिनल झाल्याने नव्या गाड्या सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल. तसेच प्रवाशांची लोकलमधील गर्दीतूनही सुटका होणार आहे. वसई रोड स्थानकात टर्मिनस बनवावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. यामुळे पश्चिम रेल्वेवरील इतर टर्मिनसवरील ताण कमी होईल. त्यासाठी रेल्वे टर्मिनससाठी वसई-सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने पालघरचे खासदार हेमंत सावरा यांच्याकडे केली होती. त्यांच्यामार्फत रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरवा सुरू केला होता. अखेर मंत्रिमंडळाने या टर्मिनसला मान्यता दिली असून, वसईत लवकरच रेल्वे टर्मिनस तयार केले जाणार असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली.

याआधीही घोषणा

यापूर्वी २०१८मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी वसईत रेल्वे टर्मिनस उभारण्याची घोषणा करून ते २०२३पर्यंत पूर्ण करण्याचा दावा होता. मात्र त्याचे पुढे काहीही झाले नाही. त्यातच पुन्हा ही घोषणा रेल्वेमंत्र्यांकडून करण्यात आल्यामुळे यावेळी टर्मिनस बनणार का याकडे, आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.