Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Nashik Woman Give Birth To Child During MPSC Exam: परीक्षेसाठी परीक्षाकेंद्रावर पोहोचल्या, पेपरही सुरु झाला. पेपर सुरु होताच परीक्षार्थी महिलेला प्रसूतीकळा सुरु झाल्या.
स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होत अधिकारी होण्याचे स्वप्न डोळ्यांत साठवून मालेगावहून युगंधरा व पती गोरख हे रविवारी (दि. १) नाशिकमध्ये परीक्षेसाठी पोहोचले. युगंधरा यांचा कॅनडा कॉर्नर येथील व्ही. एन. नाईक महाविद्यालयात, तर गोरख यांचा रमाबाई आंबेडकर कन्या शाळेत परीक्षेचा बैठक क्रमांक होता. युगंधरा यांना परीक्षा केंद्रावर पोहोचवून गोरख त्यांच्या केंद्रावर पोहोचले. सकाळी नऊ वाजेपासून परीक्षा केंद्रात बसलेल्या युगंधरा यांना पेपर सुरू झाल्यानंतर दहा वाजेच्या सुमारास प्रसूतीकळा सुरू झाल्या. त्यातच रक्तस्रावही सुरू झाला. त्यामुळे पर्यवेक्षक आणि परीक्षार्थींची धांदल उडाली.
केंद्र प्रमुखांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यावर सरकारवाडा पोलिस ठाण्याचे हवालदार जयंत जाधव व महिला अंमलदार रोशनी भामरे यांनी धाव घेतली. दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता केंद्रावरील शासकीय वाहनातून युगंधरा यांना उपचारार्थ पंडित कॉलनीतील रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक तपासणीनंतर त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील वेद मंदिराजवळील खासगी रुग्णालयात युगंधरा यांना दाखल करण्यात आले. तेथे त्यांनी मुलीला जन्म दिला. दरम्यान, युगंधरा या गट ब वर्गातील अधिकारीपदाची परीक्षा देत होत्या. त्यांनी बीएस्सी ॲग्री पदवी संपादित केली असून, वर्षभरापूर्वीच त्यांचे लग्न झाले. प्रसूतीची माहिती मिळताच त्यांच्या आई सरला शेवाळे व कुटुंबाने रुग्णालयात धाव घेतली.
आई अन् बाळ सुखरूप
पंडित कॉलनीतील रुग्णालयात पोहोचल्यावर युगंधरा यांची तब्येत अधिक खालावली. नऊ महिने होण्यापूर्वीच प्रसूतीकळा सुरू झाल्याने शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे सांगत डॉक्टरांनी मोठ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. अंमलदार जाधव यांनी तातडीने दुसऱ्या रुग्णालयात फोन करून घटनेची माहिती दिली. त्यामुळे दुसऱ्या रुग्णालयात युगंधरा पोहोचण्यापूर्वी त्यांच्या शस्त्रक्रियेसाठीची संपूर्ण तयारी केली होती. दरम्यान, परीक्षा केंद्रावरील यंत्रणा व दोन्ही पोलिस अंमलदारांनी तातडीने मदत केल्याने महिलेसह बाळ सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गायकवाड दाम्पत्याच्या नातलगांनीही पोलिसांनी आभार मानले.
Nashik News: MPSC च्या परीक्षेला आले अन् आई-बाबा झाले!, पेपर सुरु असतानाच महिलेला प्रसूतीकळा
युगंधरा यांना रुग्णालयात दाखल केल्यावर दोन्ही पोलिसांनी त्यांचे पती व चुलत बंधूंचा मोबाइल क्रमांक मिळवला. त्यावेळी पती गोरख हेदेखील परीक्षेसाठी नाशिकमध्ये असल्याचे समजते. मुंबईनाका पोलिसांना ‘कॉल’ देत गोरखपर्यंत निरोप पोहोचविण्यास सांगण्यात आले. मुंबईनाका पोलिसांनी रमाबाई आंबेडकर शाळेत पर्यवेक्षकांद्वारे गोरख यांना ‘गोड बातमी’ कळवली. पहिल्या सत्राचा पेपर संपताच गोरख यांनी रुग्णालय गाठून नवजात बाळासह पत्नीची भेट घेतली.