Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुंबई, दि. ११: ‘पर्यावरण रक्षणासाठी अव्याहतपणे झटणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ जीवनगौरव पुरस्कार मिळणे देश आणि राज्यासाठी अभिमानास्पद आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे अभिनंदन केले आहे.
शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या युनायटेड नेशन्स एन्व्हायर्न्मेंट प्रोग्रामतर्फे (यूएनईपी) प्रतिष्ठेच्या ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ पुरस्कारांमध्ये जगभरातील सहा मान्यवरांच्या यादीत डॉ गाडगीळ जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरणे हे निश्चितच आपल्या सर्वांसाठी गौरस्वापद आहे. यातून डॉ गाडगीळ यांच्या कार्याचा उचित सन्मान झाला आहे. पर्यावरण, जैवविविधतेचे रक्षण हा त्यांचा ध्यास राहिला आहे. त्याला त्यांनी जीवनकार्य मानले आहे. यातूनच ते गेली अनेक दशके या क्षेत्रात अथकपणे संशोधन करत आहेत. विशेषतः पश्चिम घाट क्षेत्रातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील, जैवविविधतेबाबत त्यांनी केलेले काम मार्गदर्शक, दिशादर्शक राहिले आहे. यातून आपल्या सर्वांना पर्यावरण रक्षण, जतन संवर्धनासाठी प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळत राहणार आहे. यापुढेही डॉ. गाडगीळ या क्षेत्रात मोलाची योगदान देत राहतील, असा विश्वास आहे. या आंतररराष्ट्रीय पुरस्कारासाठी डॉ. गाडगीळ यांचे अभिनंदन, आणि त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा,असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.