Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
एकीकडे अल्लू अर्जुन तुरुंगाबाहेर, दुसरीकडे ‘पुष्पा २’ची कमाई दुप्पट! १००० कोटी क्लबमध्ये होणार एन्ट्री
Allu Arjun Pushpa 2 Box Office Collection: अभिनेता अल्लू अर्जुन ‘पुष्पा २’मुळे विशेष चर्चेत आहे. या सिनेमासंबंधीत एका प्रकरणात अलीकडेच अभिनेत्याला अटक झाली आणि लगेचच त्याची सुटकाही झाली. या प्रकरणानंतर बॉक्स ऑफिस कलेक्शनवर नेमका काय परिणाम झाला?
४ डिसेंबर रोजी झालेल्या या चित्रपटाच्या प्रीमियर शो दरम्यान हैदराबाद याठिकाणी असणाऱ्या संध्या थिएटरमध्ये मोठी चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगराचंगरीत एका ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा मुलगा जखमी झाला होता. त्या महिलेच्या पतीने एफआयआर दाखल केला, ज्यानंतर पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक केली. या घटनाक्रमाचा चित्रपटाच्या व्यवसायावर उलट परिणाम झाला आणि कमाईत मोठी वाढ झाली आहे.
‘पुष्पा २’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन
दुसऱ्या शनिवारी १४ डिसेंबर रोजी ‘पुष्पा २’ने ६२.३ कोटी रुपयांची कमाई केली, त्यापैकी ४६ कोटी रुपये हिंदीतून आणि १३ कोटी रुपये तेलुगूमधून आले. शुक्रवारी एकूण कलेक्शन केवळ ३६.५ कोटी रुपये होते. त्यामुळे चित्रपटाची कमाई थेट दुप्पट झाली आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, भारतातील सर्व भाषांमध्ये चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता ८२४.५ कोटी रुपये झाले आहे.
दाक्षिणात्य भाषांपेक्षा हिंदीतून सर्वाधिक कमाई
आश्चर्याची गोष्ट म्हणजे या एकूण कलेक्शनपैकी ४९८ कोटी रुपये हिंदीतून आले आहेत, जे तेलगू व्हर्जनच्या कमाईपेक्षा कितीतरी जास्त आहे. या चित्रपटाने सर्व भाषांमधील ‘जवान’ आणि ‘आरआरआर’च्या लाइफटाइम कलेक्शनला मागे टाकले आहे. ‘KGF: Chapter 2’ ला मागे टाकून ‘पुष्पा २’ सध्या सर्वाधिक कमाई करणारा सहावा हिंदी चित्रपट आहे, केजीएफ २ ने ४३४.६२ कोटी रुपयांची कमाई केली होती. रविवारीही असेच कलेक्शन राहिल्यास अल्लू अर्जुनचा हा सिनेमा ‘बाहुबली २’ आणि ‘गदर २’च्या हिंदी कलेक्शनलाही मागे टाकू शकतो.