Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुंबई दि. 26 : अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण हा विभाग सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित असलेला विभाग आहे. सेवा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व या त्रिसुत्रीचा अवलंब करुन विभागाचे काम अधिक प्रभावीपणे करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.
स्मार्ट शिधापत्रिका आणि आधुनिक गोदाम व्यवस्था याला प्राथमिकता देणार असल्याचेही श्री. मुंडें यांनी यावेळी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा श्री. मुंडे यांनी घेतला.
शंभर दिवसांचा कार्यक्रम तयार करत असताना विभागाचे डिजिटायजेशन, आधुनिक गोदाम व्यवस्था याचा अंतर्भाव करण्याच्या सूचना देऊन अन्न, नागरी पुरवठा मंत्री श्री. मुंडे म्हणाले की, धान्य खरेदी ते धान्य वितरण या प्रत्येक टप्प्यावर त्याची अद्ययावत माहिती घेणारी यंत्रणा निर्माण करावी, धान्याचे वितरण जलद होण्यासाठी ‘एक गाव एक गोदाम’ ही योजना तातडीने कार्यान्वित करावी, स्मार्ट गोदाम उभारण्यात यावीत, वितरण व्यवस्था सुधारल्यामुळे होणारे नुकसान कमी होऊन ग्राहकांना आणि लाभार्थ्यांना फायदा होईल, लाभार्थ्यांना स्मार्ट शिधा पत्रिका वितरण करण्याची कार्यवाही सुरू करावी, धान्य खरेदी ही विकेंद्रित करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा तसेच जास्तीत जास्त गोदामांची उभारणी करण्यात यावी अशा सूचना त्यांनी दिल्या.
अन्न, नागरी पुरवठा मंत्री श्री. मुंडे म्हणाले की, ग्राहक संरक्षण आणि धान्य वितरण यासाठी डिजिटल डॅश बोर्ड विकसित करावा, ग्राहक संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी, त्यामध्ये शाळा, महाविद्यालय यांना सहभागी करून घ्यावे, लाभार्थ्यांना सुलभ आणि त्वरित तक्रार निवारण होईल, अशा प्रकारची यंत्रणा निर्माण करावी.
बैठकीस अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, सहसचिव रामचंद्र धनावडे, उपसचिव राजश्री सारंग, संतोष गायकवाड यांच्यासह, अवर सचिव व अधिकारी उपस्थित होते.
००००
हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/