Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
एसटीच्या भाईंदर -पश्चिम येथील जागेचा महापालिकेच्या माध्यमातून विकास करणार -मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद
ठाणे, दि.२८ (जिमाका): एसटीच्या भाईंदर पश्चिम येथील जागेचा मीरा-भाईंदर महापालिकेच्या माध्यमातून विकास करण्यात येणार असून या प्रकल्पांतर्गत भव्य असे वातानुकूलित मच्छी मार्केट बनविण्यात येणार आहे. याबरोबरच परिवहन विभागाचे उपप्रादेशिक कार्यालय देखील या इमारतीतून सुरू करण्यात येणार असून रेल्वेच्या प्रवाशांना पे ॲड पार्कची देखील सुविधा या प्रकल्पामध्ये करण्यात येईल. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी परिवहन विभागाचे आयुक्त विवेक भीमनवार, मीरा -भाईंदर महापालिकेचे आयुक्त संजय काटकर व एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर आदी उपस्थित होते.
एसटी महामंडळ, परिवहन विभाग व मीरा -भाईंदर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकारी यांची बैठक घेतल्यानंतर ते पुढे म्हणाले की, सन. १९८६ पासून अविकसित असलेल्या भाईंदर -पश्चिम येथील एसटीच्या सुमारे ७४०० चौरस मीटर जागेचा विकास मीरा-भाईंदर महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार असून या प्रकल्पामध्ये ५० टक्के जागा एसटी महामंडळाला उर्वरित ५० टक्के जागा ही महापालिकेला वापरण्यासाठी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामध्ये एसटीच्या ९ मीटर आकाराच्या इलेक्ट्रिक बसचे आगार व बसस्थानक,परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि महापालिकेतर्फे सुमारे ३० हजार चौरस मीटर क्षेत्रावर वातानुकूलित मच्छी मार्केट तयार करणे, प्रस्तावित आहे. या एकूण प्रकल्पाचा खर्च सुमारे १३६ कोटी असून हा खर्च मीरा-भाईंदर महापालिका व राज्य शासन संयुक्तपणे उचलणार आहेत.
सर्व महापालिका क्षेत्रात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय
यावेळी बोलताना मंत्री श्री. सरनाईक यांनी राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रामध्ये यापुढे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात येईल, अशी घोषणा केली. महापालिका क्षेत्रामध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढत असून त्या लोकसंख्येचा विचार करता प्रत्येक महापालिका क्षेत्रामध्ये एक उपप्रदेशिक कार्यालय असावे, या मागणीला जोर धरला होता. त्यामुळे भविष्यात जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन परिवहन संबंधित कामे करण्याची महापालिका क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेला तसदी घ्यावी लागणार नाही ,ती सर्व कामे आता महापालिका क्षेत्रामध्ये त्यांना करणे शक्य होणार आहे.असे प्रतिपादन त्यांनी केले.
स्वयंचलित संगणकीय वाहन चाचणी केंद्र उभारणार
मीरा -भाईंदर येथील उत्तन येथे महसूल विभागाकडून परिवहन विभागाला हस्तांतरित होणाऱ्या ९७०० चौरस मीटर जागेवर स्वयंचलित संगणकीय वाहन चाचणी केंद्र उभारण्यात येणार असून त्या जोडीला स्वयंचलित वाहन चालक चाचणी मार्ग देखील उभारला जाणार आहे. अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली अशी चाचणी केंद्रे राज्यभरात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी उभारण्यात येणार असल्याचा धोरणात्मक निर्णय या वेळी घेण्यात आला.
दरम्यान एका प्रवासाने मंत्री श्री. सरनाईक यांच्याकडे एसटीचे संगणकीय आरक्षण केंद्र हे दुपारी ३ वाजेपर्यंतच उघडे असते, संध्याकाळी येणाऱ्या प्रवाशांना संगणकीय आरक्षण केंद्रावर तिकीट उपलब्ध होत नाही. अशी तक्रार केली. यावेळी उपस्थित असणाऱ्या एसटी अधिकाऱ्यांना तिथेच आदेश देऊन आजपासूनच सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत संगणकीय आरक्षण केंद्र सुरू ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले.
०००