Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आदिवासी मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके
नागपूर, दि. ०३: विविध आव्हानांवर मात करुन राज्याच्या आदिवासी भागात असूनही तुम्ही गुणवत्ता व कौशल्याच्या बळावर या राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे याचा मला मनस्वी आनंद आहे. तुम्ही ज्या गुणवत्तेच्या आधारावर इथपर्यंत झेप घेतली आहे त्याला आता भविष्यात एखाद्या कौशल्याची जोड द्या. या कौशल्यातूनच तुमचे आत्मनिर्भरतेचे मार्ग अधिक समृद्ध होत जातील. आपल्या क्षेत्रात अधिक पारंगत होण्यासाठी तत्पर रहा, या आश्वासक शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आदिवासी युवकांना यशाचा मंत्र दिला.
आदिवासी विकास विभागाच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते, परिवहन, व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पार पडले. या समारंभास आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके, राज्याच्या आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे, नागपूर विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, माजी आमदार टेकचंद सावरकर, माजी महापौर माया इनवाते, अमरावती विभागाचे अपर आयुक्त जितेंद्र चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
आदिवासी भागातील युवकांमध्ये, युवतींमध्ये एक सुप्त शक्ती दडलेली असते. या सुप्तशक्तीला, या असामान्य गुणवत्तेला त्यांच्या शालेय जीवनापासूनच पुढे आणण्याची जबाबदारी ही त्या-त्या शाळांमधील शिक्षकांवर आहे. या मुलामुलींमधून अभियंता, डॉक्टर, शिक्षण, क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रातील गुणवंत घडू शकतात. आदिवासी विभागात अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी मुलांच्या उज्ज्वल भवितव्याला साकार करण्यासाठी पुढे आले पाहिजे. शिक्षणासमवेत स्पर्धा परीक्षा, उत्तम कौशल्य याची जोड कशी देता येईल यादृष्टीने आदिवासी विभागाने अधिक प्रभावी नियोजन करण्याची अपेक्षा केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी व्यक्त केली.
राज्यात आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या विविध शाळा, आश्रमशाळामधून सुमारे साडेचार लाख मुले व मुली शिक्षण घेत आहेत. यातील सर्वाधिक मुले ही वाड्यापाड्यावर, आदिवासी क्षेत्रात राहणारी मुले आहेत. यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, त्यांना शिक्षणाच्या दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाने आश्रमशाळा, निवासीशाळा सुरु करुन त्यांना पुरेसा निधी दिला आहे. आदिवासी मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कटिबद्ध असून या क्रीडा स्पर्धातून ही मुले नवी ऊर्जा घेतील, असा विश्वास आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र आता थांबणार नाही असे स्पष्ट केले आहे. त्यासाठी आदिवासी विकास विभाग सिद्ध झाला असून या राज्य पातळीवरील स्पर्धेतून अनेक कुशल क्रीडापटूंच्या भविष्याला योग्य दिशा मिळेल, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अमरावती, ठाणे, नाशिक व नागपूर या चारही विभागातील ३० प्रकल्पातील १ हजार ८७० खेळाडूंनी मान्यवरांना मानवंदना दिली. नागपूर येथील सेंट उर्सुला हायस्कूलच्या विद्यार्थिनी गोंडी भाषेतील स्वागत गीत सादर केले. गडचिरोली येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेतील मुला – मुलींनी आदिवासी पारंपरिक नृत्य सादर केले. या राज्यस्तरीय क्रीडा संमेलनात १४,१७ व १९ वर्षे वयोगटात सांघिक व वैयक्तिक खेळाचे आयोजन केले आहे. राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या महासंग्रामात राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील 1 हजार 917 आदिवासी खेळाडू आपल्या अंगी असलेले क्रीडा कौशल्य व नैपुण्य दाखविणार आहेत.
यावेळी नागपूर विभागातील शासकीय आश्रम शाळांमध्ये राबविल्या जात असलेल्या ब्राइटर माईंड उपक्रमांतर्गत डोळ्याला पट्टी बांधून रंग ओळखणे, पुस्तक वाचणे, मोबाईल वरील फोटो ओळखणे, व्यक्ती ओळखणे, डब्यात ठेवलेल्या बॉलचा आवाजावरून रंग ओळखणे याचे बिनचूक सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. नागपूर विभागातील गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथील लोक बिरादरी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मलखांब कौशल्याने उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे संचालन जवाहर गाढवे यांनी केले. अपर आयुक्त रविंद्र ठाकरे(भाप्रसे) यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागपूर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
०००