Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
शंकरपटाच्या लोकप्रियतेवर माळेगावच्या गर्दीचे शिक्कामोर्तब; हजारो शेतकऱ्यांनी अनुभवला ५८ बैल जोड्यांचा सहा तास थरार – महासंवाद
नांदेड दि. ४ जानेवारी : लाईन क्लिअर…जोडी सोडा… जोडी मालकासाठी खुशखबर… तीन सेकंद 38 पाँईट… आणि वायुगतीने… विक्रमी वेळेत अंतर पार… पाठोपाठ शेतकऱ्यांच्या टाळ्या शिट्ट्या… अशा माळेगावच्या माळरानावरील धावत्या समालोचनात ५८ बैल जोड्यांनी डोळ्यांचे पारणे फेडणारा थरार रचला. शंकर पटाच्या गर्दीने हा खेळ तुफान लोकप्रिय असल्याचे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले.
शेती,मातीत रमणाऱ्या शेतकऱ्यांचा माळेगावचा शंकरपट म्हणजे जीव की प्राण. न्यायालयाच्या निर्णयानंतर गेल्या वर्षीपासून पुन्हा बैलगाड्यांच्या शर्यतीला सुरुवात झाली आहे. बंदी उठल्यावरचा आजचा माळेगावचा दुसरा शंकरपट. आज गर्दीचे सर्व उच्चांक मोडत माळेगावात मराठवाडा, विदर्भातील तसेच बाजूच्या राज्यातील शेतकऱ्यांनी या शंकरपाटासाठी गर्दी केली होती. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून यासाठी बैलजोडी आल्या होत्या. त्यामुळे यंदाचा शंकरपठ अतिशय चुरशीचा गर्दीचा आणि उत्कंठेचा ठरला आहे.
माळेगावात आज दुपारपासून 58 जोडीनी आपले कसब दाखविले. सायंकाळी साडेपाच पर्यंत हा थरार सुरू होता.
माळेगावच्या यात्रेला आज एक आठवडा झाला. 29 डिसेंबरच्या पालखी यात्रेनंतर सुरू झालेली माळेगावची यात्रा आज शंकर पटाने गाजवली उद्या माळेगाव यात्रेची आणखी एक परंपरा असणाऱ्या कुस्तीच्या फडाने शासकीय कार्यक्रमाची सांगता होणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनीही आज शंकरपटाचा आनंद घेतला. त्यानंतर आमदार बालाजी कल्याणकर यांनी देखील यात्रेला भेट दिली.
तत्पूर्वी आज या कार्यक्रमाचे उद्घाटन आ. आनंदराव बोंढारकर यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, पोलीस अधिकारी अश्विनी जगताप, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, नरेगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडीलवार, सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. दिनेश महेर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डाॅ. प्रवीणकुमार घुले, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, सरपंच प्रतिनिधी हनुमंत धुळगंडे, गट विकास अधिकारी दशरथ आडेराघो, पंचायत समितीचे माजी सभापती आनंदराव शिंदे, अंबादास जाहागीरदार, अशोक मोरे, नरेंद्र गायकवाड, उद्धव शिंदे, विस्तार अधिकारी धनंजय देशपांडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रारंभी खंडोबाच्या प्रतिमेचे पूजन करून दुपारी एक वाजता शंकरपट शर्यतीला सुरुवात झाली. या शर्यतीसाठी नांदेडसह पालम, गंगाखेड, पूर्णा, परभणी, लातूर, अहमदपुर, हिंगोली आदी ठिकाणांहून 58 बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. वेगवान धावणाऱ्या बैलजोड्यांनी उपस्थित लाखो प्रेक्षकांना अक्षरशः थक्क केले. शेतकऱ्यांसाठी ही स्पर्धा केवळ मनोरंजन नाही तर त्यांच्या मेहनतीचा व बैलांवरील प्रेमाचा सन्मान असल्याचे यावेळी एका शेतकऱ्यांनी बोलून दाखवले. पंच म्हणून जनार्दन मंदाडे व नागेश मंदाडे यांनी काम पाहिले.शंकरपटाचे पहिले पारितोषिक 31 हजार, द्वितीय 21 तर तृतीय पारितोषिक 11 हजार रुपये आहे.तसेच काही जणांना प्रोत्साहनपर बक्षीस दिले जातात.
0000