Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नवी मुंबई, नागपूर, शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि.०६ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह नागपूर, शिर्डी विमानतळाचे काम गतीने करून दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित राज्यातील सर्व विमानतळाच्या बांधकाम प्रगतीच्या कामासंदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, विमान वाहतूक हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. केंद्र सरकार आणि राज्य शासनाला आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करणे फार गरजेचे आहे. देश ५ ट्रिलीयन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना, हे क्षेत्र फार महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन म्हणून काम करत आहे. या क्षेत्रातील बारीक सारीक गोष्टीवर देश आणि राज्याला काम करावे लागणार आहे. या क्षेत्रातील वाढती संख्या विचारात घेऊन पायाभूत सुविधांचा विस्तार करावा लागणार आहे. सोलापूर आणि कोल्हापूर येथे नाईट लँडिंग होईल, असे नियोजन करण्याचे त्यांनी निर्देश दिले.
शिर्डी नाईट लँडिंग सुविधा लगेच सुरू करा. नागपूर आणि शिर्डी विमानतळाचे अडलेले प्रश्न ३१ मार्चपर्यंत सोडवा. जळगाव येथे नवीन टर्मिनल इमारत तयार करा, पुरंदर विमानतळ जागा अधिग्रहण प्रक्रिया लवकर सुरू करा. पालघर विमानतळ उभारणीसाठी प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, वाढवण बंदर हे केंद्र आणि राज्य शासनाचा महत्त्वाचा प्रकल्प होणार आहे. जगातील सर्वात मोठ्या १० बंदरापैकी एक हे बंदर असेल. देशातील सर्वात मोठी व्यापारी वाहतूक या ठिकाणाहून होणार आहे. या भागातून बुलेट ट्रेन, कोस्टल रोड जाणार आहे. याठिकाणी चौथी मुंबई साकारणार आहे. यासाठी वाढवण येथे तात्काळ नवीन विमानतळाचा निर्णय घेणे, आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कामाची चांगली प्रगती असून, अधिक गतीने काम सुरू करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. नवी मुंबई विमानतळ 85% पूर्ण झाले आहे. या विमानतळाची क्षमता मुंबई विमानतळापेक्षा दुप्पट असणार आहे. कामे गुणवत्तापूर्ण कालमर्यादेत करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या. यावेळी त्यांनी राज्यातील 11 विमानतळांचा आढावा घेतला.
अमरावतीत एअर इंडियाची फ्लाईंग अकॅडमी सुरू होणार असून ही आशियातील सर्वात मोठी अकादमी असणार आहे.
ज्या विमानतळावर रात्री विमान उतरण्याची सुविधा आहे. तेथेही काही अडचणी येत असल्याचे समजले आहे. काही विमानतळाची कामे अनेक दिवसांपासून सुरू आहेत. उशीर का होत आहे याची कारणे शोधून लवकरात लवकर मार्ग काढून कामे पूर्ण करावी असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी नवी मुंबई, नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळांचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. यामध्ये झालेले काम, उर्वरित कामासाठी लागणारा कालावधी, प्रलंबित परवानग्या,आर्थिक बाजू, जमीन संपादन अशा विविध घटकांचा आढावा घेतला. याबरोबर राज्यातील सर्व विमानतळांचा सादरीकरणाच्या माध्यमातून आढावा घेतला.
यावेळी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सहसचिव रुबिना अली, असंगबा चुबा एओ, सहसंचालक नयोनिका दत्ता, जे. टी. राधाकृष्ण, प्रादेशिक कार्यकारी, भारतीय विमानतळ प्राधिकरण, पश्चिम क्षेत्राचे वरिष्ठ अधिकारी फैज अहमद किडवाई, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कार्यकारी अधिकारी, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कार्यकारी अधिकारी यांच्यासह मुख्यमंत्री सचिवालय तसेच विविध विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव, सचिव आदी उपस्थित होते.
०००