Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
छत्रपती महाराणी ताराबाई यांचे कार्य सर्वदूर जाण्यासाठी लेखणीची गरज – श्रीमंत शाहू महाराज छत्रपती – महासंवाद
कोल्हापूर, दि. 13 : छत्रपती ताराबाई यांच्या कार्याची स्फूर्ती घेऊन आत्ताच्या पिढीने पुढे जात राहिले पाहिजे यासाठी त्यांचा इतिहास प्रत्येकाला माहित असणे गरजेचे असून त्यांनी केलेले कार्य लेखणीतून समोर येणे आवश्यक आहे. ज्येष्ठ इतिहास तज्ञ जयसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या पुस्तकातून छत्रपती ताराबाई यांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचेल अशी आशा श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केली. महाराणी ताराबाई यांच्या ३५० व्या जयंती वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्वांचा एक भाग म्हणून महाराणी ताराबाई यांच्या जीवनकार्याची माहिती देणाऱ्या चित्ररथाची बांधणी करण्यात आलेली असून त्याचे भव्य उद्घाटन छ.शाहू महाराज समाधी स्थळ, नर्सरी बाग, कोल्हापूर येथे करण्यात आले. महाराणी ताराबाई यांच्या जीवनावर आधारीत विशेष चित्ररथाची संकल्पना ॲड. आशिष शेलार मंत्री सांस्कृतिक कार्य यांची असून विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनातून चित्ररथाची निर्मिती झाली आहे. उद्घाटन प्रसंगी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, हसन मुश्रीफ, मंत्री वैद्यकीय शिक्षण, खासदार धनंजय महाडिक, इतिहास तज्ञ जयसिंगराव पवार तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मान्यवर या सर्वांच्या हस्ते विशेष चित्ररथाचे उद्घाटन करण्यात आले. मंत्री सांस्कृतिक कार्य आशिष शेलार हे ऑनलाइन उपस्थित होते. हा चित्ररथ कोल्हापूर शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रदर्शित करण्यात येणार आहे.
महाराणी ताराबाई यांचा पराक्रम महानच – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले मराठा साम्राज्य पुढे चांगल्या प्रकारे महाराणी ताराबाई यांनी चालवले. त्यांनी दिलेला लढा आणि त्यांचे कार्य महानच असून त्यांचा इतिहास सर्वांना कळवा, त्यांनी केलेल्या महान कार्याची ओळख सर्वांना व्हावी यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने आयोजित केलेला हा कार्यक्रम अतिशय अभिनंदनीय असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी उद्घाटन कार्यक्रमावेळी सांगितले.
ज्येष्ठ इतिहास तज्ञ जयसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या छत्रपती ताराबाई यांच्या पुस्तकातून त्यांचा इतिहास राज्याला प्रेरक ठरेल – सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार
कोणताही इतिहास उद्याचे भविष्य घडवतो. महाराणी ताराबाई यांनी मराठा साम्राज्यासाठी दिलेले योगदान तसेच त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन ही संकल्पना सांस्कृतिक कार्य विभागाकडून राबविण्यात येत आहे. ज्येष्ठ इतिहास तज्ञ जयसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या छत्रपती ताराबाई यांच्या पुस्तकातून त्यांचा इतिहास नक्कीच राज्याला प्रेरक ठरेल असे मत सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केला. ते दूरदृश्य प्रणालीद्वारे चित्ररथाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. ते म्हणाले छत्रपती ताराबाई यांचा लढा, त्यांचे नेतृत्व जनतेसमोर आणायचे आहे. यासाठी चित्ररथ तसेच विविध प्रदर्शनातून लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी राज्यातील सहा विभागात सहा ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच येत्या काळात छत्रपती ताराबाई यांच्या नावाने टपालाचे तिकीटही प्रसिद्ध केले जाणार आहे. येत्या वर्षभरात छत्रपती ताराबाई यांच्यावर आधारित विविध नाटकांचे आयोजनही करण्यात येणार आहे. त्यांचे शौर्य, इतिहास चांगल्या प्रकारे लोकांच्या समोर येईल. तसेच मंत्री हसन मुश्रीफ यांनी मागणी केल्यानुसार जयसिंगराव पवार यांचे पुस्तकही सर्वांसमोर पोहोचेल यासाठी नियोजन केले जाईल असे ते म्हणाले. अभ्यासक, इतिहास संशोधक व नागरीकांनी या महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर आधारीत विशेष चित्ररथाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन मंत्री शेलार यांनी यावेळी केले.
ज्येष्ठ इतिहास तज्ञ जयसिंगराव पवार यांनी महाराणी ताराबाई यांनी केलेल्या कार्याची माहिती थोडक्यात सांगितली. खासदार धनंजय महाडिक यांनीही या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देऊन महाराणी ताराबाई यांच्या कार्याबाबत थोडक्यात माहिती दिली. कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रस्ताविक सहसंचालक सांस्कृतिक कार्य विभाग श्रीराम पांडे यांनी केले तर आभारही त्यांनीच मानले.