Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १६ जानेवारीला उद्घाटन – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती – महासंवाद

5

मुंबई, दि. 14 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने एम्पॉवरींग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र (Empowering Innovation, Elevating Maharashtra) या संकल्पनेवर आधारित ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये १६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे. महाराष्ट्रासह देशभरातील तंत्रज्ञान, कृषी, सेवा क्षेत्र, औषधनिर्माण तसेच पर्यटन अशा विविध क्षेत्रांतील १००० स्टार्टअप या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमास मेरीको लिमिटेडचे अध्यक्ष हर्ष मारीवाला, अपग्रेड अँड स्वदेस फाउंडेशनचे सह संस्थापक रॉनी स्क्रूवाला, नायकाच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी फाल्गुनी नायर, व्हेंचर कॅपिटल अँड स्टार्ट अप्स गुगलचे जागतिक प्रमुख अपूर्वा चमरिया, स्थानिक सरकार आणि शिक्षण AWS चे राज्य प्रमुख अजय कौल, ईव्ही कॅप वेंचर्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय पार्टनर विक्रम गुप्ता, अवेंडसचे सह-संस्थापक आणि कार्यकारी उपाध्यक्ष राणू वोहरा, इनक्युबेशन MGB इनोव्हेशन फाउंडेशन पार्टनर अध्यक्ष JITO जिनेंद्र भंडारी, व्हेंचर कॅटालिस्ट अँड नाईन युनिकॉर्नचे सह-संस्थापक अपूर्व रंजन शर्मा, ब्लू स्मार्टचे सह-संस्थापक पुनीत गोयल, रेनट्री फाउंडेशनच्या संस्थापक आणि संचालिका लीना दांडेकर, ओपन सीक्रेटच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अहाना गौतम, चलो मोबिलिटीच्या सह संस्थापक आणि संचालक प्रिया सिंग, जिओ जेन नेक्स्टच्या प्रमुख अमेय माशेलकर, सुपर बॉटम्सच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी उतगी, अस्थिरोग तज्ज्ञ आणि कलाकार सलोनी पटवर्धन इ. मान्यवर उपस्थित राहुन आपल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण  करणार आहेत.

दिवसभरात होणार विविध पॅनेल चर्चा : कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, दिवसभरात होणाऱ्या पॅनेल चर्चांमध्ये गुंतवणूकदारांच्या गरजा आणि युवा उद्योजकांच्या यशकथा यावर विशेष सत्रे आयोजित केली जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 जानेवारीला राष्ट्रीय स्टार्टअप दिन घोषित केला आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाज माध्यमांवरही कार्यक्रम थेट प्रक्षेपित केला जाणार आहे.

एक दिवसीय कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, कौशल्य विकास आयुक्त प्रदीपकुमार डांगे यांनी केले आहे.

****

संध्या गरवारे/विसंअ/

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.