Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणार
पुतळा उभारणीसाठी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल समन्वयक
नवी दिल्ली, दि. 14 : मराठ्यांनी राष्ट्र संरक्षणार्थ पानिपतच्या युद्धात जीवाची बाजी लावून लढा दिला. या युद्धाच्या शौर्य स्मारकासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पानिपत येथे दिली.
पानिपत युद्धाला २६४ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने येथील कालाआम परिसरात आज मराठा शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते. मराठा वीर योद्ध्यांना अभिवादन करण्यासाठी गत १९ वर्षांपासून पानिपत शौर्य समितीच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
याप्रसंगी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रीडा तथा युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे राजशिष्टाचार तथा पणन मंत्री जयकुमार रावल, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, खासदार राजाभाऊ वाझे आणि हरियाणा शासनाचे अधिकारी, स्थानिक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, या युद्ध मोहिमेतून त्याकाळी बरेच काही शिकता आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला जाती पातीपलीकडे देशासाठी लढण्याची दिलेली शिकवण मावळ्यांनी पाळली आणि म्हणून दिल्लीचे तख्त मराठ्यांनी एकेकाळी राखले. ही एकीची शिकवण कायम ठेवून विकसित महाराष्ट्र आणि भारत घडवूया ,असेही ते म्हणाले.
या स्मारकासाठी अधिकची जमीन आवश्यक असल्याने त्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे नमूद करुन या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळाही राज्य शासनातर्फे उभारला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केली. यासाठी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल समन्वयक म्हणून काम पाहतील, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पानिपत शौर्य समितीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी केले. यावेळी. समितीच्यावतीने अमरावतीचे नितीन धांडे यांना शौर्यस्मारक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सशक्त भारत परिवार, मराठा सेवा संघ, हरियाणा समस्त धानक मराठा समाज, धनुष्यधारी धानक समाज, मराठा उत्थान समिती, मुदगल चेतना परिवार चेरिटेबल ट्रस्ट छत्रपती शिवाजी महाराज वेलफेयर संघ, पानिपत सार्वजानिक मराठा गणेश मंडळ, यांनी प्रयत्न केले.
कार्यक्रमाची क्षणचित्रे
- कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्य गीताने झाली.
- शिंदेशाही पगडी, शौर्य स्मारकाची प्रतिमा आणि शाल देऊन मुख्यमंत्री यांचे स्वागत.
- विविध राज्यातून तसेच महाराष्ट्रातील विविध पथकाकडून, मर्दानी खेळांचे प्रदर्शन
- महाराष्ट्र, दिल्ली, आणि पानिपत येथून मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित. खासकरून ऑस्ट्रेलियातूनही काही नागरिक आवर्जून उपस्थित.
000
अंजु निमसरकर/ मपकेनदि/ १४.०१.२०२५