Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
भारतीय राज्यघटनेमुळेच भारताची जागतिक स्तरावर शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळख – सभापती प्रा.राम शिंदे – महासंवाद
मुंबई, दि. 21 : जागतिक स्तरावर भारताने एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळख प्राप्त केली आहे.आपल्या राज्यघटनेने त्यादृष्टीने भक्कम आधारशिला प्राप्त करून दिली असल्यानेच हे शक्य झाले. लोकशाही संस्था बळकट करणे, सकारात्मक सहभाग नोंदवून संसद आणि राज्य विधानमंडळे यांचे वैभव टिकवणे आणि त्यायोगे लोक कल्याणाच्या प्रति प्रतिबद्धता सुनिश्चित करणे, कर्तव्य आपण चोखपणे बजावले पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी केले. पाटणा येथे लोकसभा अध्यक्ष श्री. ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली येथे आयोजित ८५ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत ते बोलत होते. “भारतीय राज्यघटनेची ७५ वर्षे : घटनात्मक मूल्यांच्या बळकटीकरणासाठी संसद आणि राज्य विधान मंडळे यांचे योगदान” या विषयावर या परिषदेमध्ये विचारमंथन होत आहे.
विचार व्यक्त करतांना सभापती प्रा. शिंदे म्हणाले, आपली राज्यघटना पुरेशी लवचिक असून ती आणखी सामर्थ्य प्राप्त करीत आहे. आपल्या संसदीय लोकशाहीने राज्यघटनेच्या या शक्तिमुळेच संकटांचा यशस्वी सामना केला. घटना दुरुस्तीच्या संदर्भात काहींनी हेतूता गैरसमज पसरविण्याचे प्रयत्न केले, मात्र अलीकडच्या निवडणुकांमध्ये जनतेने त्यांना नाकारून योग्य जनादेश दिला आहे.
“लोकशाहीत स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन मूल्यांना अत्यंत महत्त्व आहे. एकाला सोडून दुसऱ्याचा विचार देखील करता येणार नाही. तसे झाल्यास लोकशाही संदर्भातील मूळ संकल्पनेलाच बाधा पोहोचेल” या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना परिषदेसमोर दिलेल्या भाषणातील सावधानतेकडे सभापती प्रा. शिंदे यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले आणि सर्वांनी या मूल्यांप्रती कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले.
सर्वसमावेशिता आणि सर्वांना समान संधीची उपलब्धता हे आपल्या राज्यघटनेचे महत्वाचे वैशिष्ट्य त्यांनी यावेळी अधोरेखित केले. कोणतीही राजकीय, आर्थिक अशी कौटुंबिक पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून पुढे आलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आपल्या उल्लेखनीय कार्यकर्तृत्वाच्या आधारावर तिसऱ्यांदा योगदान देत देशाला विकासाच्या वाटेवर पुढे नेत आहेत. हे स्वयंस्पष्ट उदाहरणच यासंदर्भात पुरेसे आहे, असेही सभापती प्रा. राम शिंदे यावेळी म्हणाले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संसदीय कारकीर्दीचा प्रारंभ तेव्हाच्या बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काऊन्सिल सदस्यत्वापासून झाला आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले.
आपल्या उत्तुंग कार्यकर्तृत्वाद्वारे लोककल्याणकारी राज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेही त्यांनी यावेळी स्मरण केले.
0000