Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
संत्रावर्गीय फळ पिकाच्या फळगळतीमुळे झालेल्या नुकसानीस विशेष बाब म्हणून १६५ कोटी ८३ लाखाची मदत देण्यास राज्य शासनाची मंजुरी – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील – महासंवाद

मुंबई, दि. २२ :- वर्धा जिल्ह्यातील आर्वी उपविभागात ऑगस्ट २०२४ मध्ये ढगाळ वातावरण आणि जुलै ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत अमरावती, अकोला व बुलढाणा जिल्ह्यात ढगाळ वातावरण व सततच्या पावसामुळे संत्रा पिकाच्या फळगळतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यास विशेष बाब म्हणून १६५ कोटी ८३ लाख ८ हजाराची मदत देणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.
नैसर्गिक आपत्तीमुळे शेत पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी खचला जातो. या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आधार व दिलासा देण्यासाठी शासन त्याच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितले.
वर्धा जिल्ह्यातील आर्वी उपविभागात ढगाळ वातावरण व सततच्या पावसामुळे ऑगस्ट २०२४ कालावधीत ५ हजार ९३३ शेतकऱ्यांचे ३०१३.८५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी विशेष बाब म्हणून १०८४.९८ लाख रुपये मदत देण्यास मंजुरी दिली आहे.
तसेच, जुलै ते ऑगस्ट २०२४ कालावधीत अमरावती जिल्ह्यातील ४१ हजार ९११ शेतकऱ्यांचे ३७३९३.९७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी विशेष बाब म्हणून १३४६१.८३ लाख रुपये, अकोला जिल्ह्यातील ३ हजार ४३३ शेतकऱ्यांचे ३०२९.५० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी विशेष बाब म्हणून १०९०.६२ लाख रुपये, बुलढाणा जिल्ह्यातील ३ हजार ८५२ शेतकऱ्यांचे २६२६.८० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी विशेष बाब म्हणून ९४५.६५ लाख रुपयांची मदतीस विशेष बाब म्हणून मंजुरी दिली आहे.
००००
एकनाथ पोवार/विसंअ/