Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नंदुरबार, दि. २८ (जिमाका): जिल्हा प्रशासनाने राजभाषा मराठीसह स्थानिक बोली भाषांना प्रोत्साहन देत प्रशासन आणि लोकांमधील संवाद अधिक सुलभ व प्रभावी करण्यासाठी ‘बहुभाषिक खिसा पुस्तिका’ तयार केली असून या महत्त्वपूर्ण पुस्तिकेचे प्रकाशन कृषिमंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते झाले. या पुस्तिकेमुळे प्रशासन व समाजातील दरी कमी होईल असा विश्वास मंत्री श्री. कोकाटे यांनी व्यक्त केला.
नियोजन भवन येथील प्रकाशन सोहळ्यास खासदार ॲड. गोवाल पाडवी, माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार सर्वश्री आमशा पाडवी, शिरीष नाईक, राजेश पाडवी, जिल्हाधिकारी मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस., सहाय्यक जिल्हाधिकारी, अनय नावंदर, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे तसेच जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य डॉ. अभिजित मोरे, मधुकर पाटील, निखीलकुमार तुरखिया, निलेश माळी, मकरंद पाटील, सत्यानंद गावीत, किरसिंग वसावे, विजयसिंग पराडके, ॲड. राम रघुवंशी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांच्या संकल्पनेतून आणि शिक्षण विभागातील स्थानिक बोली भाषांतील जाणकार शिक्षकांच्या सहकार्याने तयार झालेल्या या पुस्तकात इंग्रजी, मराठी, पावरा, भिली आणि वसावे या पाच भाषांचा समावेश आहे. प्रशासन व स्थानिक समुदाय यांच्यातील संवाद अधिक सुगम करण्यासाठी हे पुस्तिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
पुस्तिकेत सामान्य, सुविधांची सुलभता, अंगणवाडी, शाळा, कृषी, स्वयं-सहाय्यता गट (SHG) आणि वनहक्क कायदा (FRA) यांसारख्या सात महत्त्वाच्या विभागांच्या कामकाजाशी संबंधित माहितीचा समावेश आहे. यामध्ये एकूण १४२ प्रश्न असून जे प्रश्न स्थानिक भाषेत प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना विचारले जाऊ शकतात. यामुळे प्रशासनाला तळागाळातील समस्या समजून घेऊन उपाययोजना करण्यास मदत होईल.
पालकमंत्री अॅड. कोकाटे म्हणाले, ‘बहुभाषिक खिसा पुस्तिका’ हा एक अभूतपूर्व उपक्रम आहे. हा उपक्रम केवळ संवाद वाढवण्यापुरता मर्यादित नाही, तर प्रशासन आणि समाजातील अंतर कमी करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.
जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी सांगितले की, “भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही तर विविध संस्कृतींना जोडणारा दुवा आहे. या पुस्तिकेमुळे तळागाळातील व्यक्तींसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यावर कार्यवाही करणे सोपे होईल.”
हा उपक्रम अधिक स्थानिक आदिवासी बोली भाषांमध्ये संसाधन विकसित करण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. ‘बहुभाषिक खिसा पुस्तिका’मुळे नंदुरबार जिल्हा प्रशासन अधिक सुसंवादी व प्रगत होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. उपस्थित मान्यवरांनीही या उपक्रमाचे कौतुक केले असून जिल्ह्यातील सर्व संबंधित याला सकारात्मक प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
या पुस्तिका निर्मितीत उपअधिकारी (प्राथमिक) डॉ. युनूस पठाण, रणधीर भामरे, दिलीप पावरा, ईश्वर गावित, अमरदास नाईक तसेच आकांक्षित जिल्हा फेलो कु. अस्मिता गुडधे यांचे महत्त्वाचे योगदान आहे.
०००