Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मनीषनगर ‘आरयूबी’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण – महासंवाद

9

  • मनीषनगर परिसरातील वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होणार
  • केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम

नागपूर, दि. 28 : मनीषनगरच्या कनेक्टिव्हिटीचा प्रश्न हा मागील वीस ते पंचवीस वर्षापासून आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी फ्लायओव्हरची उभारणी या भागात करण्यात आली. मात्र वाहतूक समस्या सोडविण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून ‘आरयुबी’ ही दुसरी कनेक्टिव्हिटी या भागात सुरू करण्याचा निर्णय घेतला. यातून या भागातील वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शहरातील सोमलवाडा (मनीषनगर) भागातील नागरिकांची वाहतूक कोंडीपासून सुटका करणाऱ्या रेल्वे अंडर ब्रिजचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या लोकार्पणप्रसंगी वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार कृपाल तुमाने, व्यवस्थापकीय संचालक- महा मेट्रो श्रावण हर्डीकर, महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी उपस्थित होते.

अतिशय आव्हानात्मक प्रकारचे हे काम होते. महा मेट्रोसह सर्वांनी चांगले काम केले आहे त्यातून ही कनेक्टिव्हिटी तयार झाली आहे. लवकरच मनीष नगरला जोडणारी तिसरी कनेक्टिव्हिटीही आपण या भागात तयार करणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले, आपण एक अंडरपास तयार केला होता. पण त्यातून समस्या सुटली नाही. म्हणून नवीन अंडरपाससाठी जागेची निवड करण्यात आली आणि महामेट्रोकडे कामाची जबाबदारी सोपविण्यात आली. आता तिसराही उड्डाणपूल महाराष्ट्र सरकारने मंजूर केला आहे. हा उड्डाणपूल थेट हॉटेल रॅडिसनजवळ उतरणार आहे. त्यामुळे भविष्यात मनीषनगर, बेसा, बेलतरोडी येथील नागरिकांची अधिक सोय होणार आहे.

सोमलवाडा (मनीषनगर) येथील रेल्वे अंडर ब्रिजविषयी…

सोमलवाडा (मनीष नगर) आरयूबी प्रकल्पाचा एकूण खर्च ३३.८३ कोटी रुपये असून, ‘आरयूबी’ची लांबी १९० मीटर, रुंदी ८ मीटर आणि उंची ४ मीटर आहे. ‘आरयूबी’चे निर्माण मुंबई-हावडा व दिल्ली-चेन्नई या निरंतर व्यस्त रेल्वे मार्गावर करण्यात आले आहे. या अंडर ब्रिजमध्ये पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र पादचारी मार्ग देखील उपलब्ध करण्यात आला आहे. आरयूबीमुळे मनीषनगर परिसर आणि वर्धा मार्ग यांच्यात चांगली कनेक्टिव्हिटी होईल. याचा मोठा फायदा मनीषनगर, बेसा, घोगली आणि बेलतरोडी येथील लाखो नागरिकांना होईल. रेल्वे फाटकामुळे होणाऱ्या त्रासापासून सुटका होईल तसेच यामुळे या परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीपासून सुटका होईल. तसेच मनीषनगर येथील रहिवाश्यांना वर्धा मार्गावर सहज प्रवेश मिळवता येईल. क्रॉसिंगवर होणारा वाहतूक कोंडीचा त्रास दूर होईल आणि त्यासोबतच प्रवासात वेळेचीही बचत होईल.

०००

 

 

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.