Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुंबई, दि. 28 : शासनाने ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी ‘परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापन केली आहे. या महामंडळाच्या माध्यमातून समाज विकासासाठी प्रयत्न करावेत. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) व परशुराम आर्थिक विकास महामंडळाने महिला लाभधारक वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.
विधानभवनात ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित समस्या व प्रश्नांबाबत आढावा बैठक झाली, बैठकीस परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅ.आशिष दामले, माधव भंडारी, वित्त विभागाचे अवर सचिव गजानन कातकाडे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक रुपेश राऊत, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे उप सचिव वर्षा देशमुख, महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) च्या निबंधक डॉ. प्रिया देशपांडे, कौशल्य विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे, ब्राह्मण सभेचे पदाधिकारी उपस्थित होते.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, ब्राम्हण समाज हा खुल्या प्रवर्गात असून ब्राह्मण समाजातील काही कुटुंब आर्थिक उत्पन गटाच्या निकषात बसणारी आहेत. त्यामुळे कमी उत्पन्न असणाऱ्या ब्राह्मण समाजातील घटकांना शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) व परशुराम आर्थिक विकास महामंडळाने ब्राह्मण समाजातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या घटकाला लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे.
वेद पाठशाळांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करावे. तसेच संत विद्यापीठ व वैदिक पाठशाळा यांच्या एकत्रीकरणातून प्रमाणपत्र कोर्स सुरू करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने याबाबत अभ्यासपूर्ण अहवाल सादर करावा, असे निर्देशही डॉ.गोऱ्हे यांनी दिले.
ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिक सहाय्य आणि विकासाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने शासनाने परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली असून ब्राह्मण समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी महामंडळाने गतीने काम करावे, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) महामंडळाच्या कामकाजाबाबत डॉ.गोऱ्हे समाधान व्यक्त केले.
0000