Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुंबई, दि. २९ :- सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नपूर्तीसाठी राज्य शासन कटिबद्ध असून येत्या दोन वर्षात म्हाडाच्या माध्यमातून सुमारे एक लाख घरांच्या उभारणीस सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्याचे गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील ३,६६२ सदनिकांच्या विक्रीकरिता संगणकीय सोडत उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री तथा पुणे पालकमंत्री अजित पवार, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, म्हाडा पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील, ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे काढण्यात आली. यावेळी श्री. शिंदे बोलत होते.
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, या गृहनिर्माण धोरणानुसार सर्वसामान्य नागरिक, काम करणाऱ्या महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ठिकठिकाणी वसतिगृह उभारले जाणार आहेत. म्हाडा पुणे मंडळाच्या ३६६२ सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित सोडतीसाठी अनामत रकमेसह ७१,६४२ अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्जदारांनी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणावर (म्हाडा) दाखवलेला हा विश्वास आहे. अर्जदारांचा हाच विश्वास सार्थ ठरवण्यासाठी घरांच्या गुणवत्ता व सोडतीच्या पारदर्शकतेमध्ये कुठेही तडजोड न करता सोडतीतील विजेत्या अर्जदारांना तात्काळ सदनिकांचा ताबा देण्यात यावा. महाराष्ट्र शासन विविध योजनांच्या माध्यमातून परवडणाऱ्या घरांची निर्मिती करीत आहे.
‘म्हाडा’ने गेल्या दीड वर्षात १३ सोडतींच्या माध्यमातून सुमारे ३० हजार घरे उपलब्ध करून दिली आहेत, ही कौतुकास्पद बाब असल्याचे ते म्हणाले. रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प मार्गी लागावेत व झोपडपट्टी पुनर्विकास व्हावा यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात गृहसाठा उपलब्ध होणार आहे. मुंबई पुणे, ठाणे या शहरांमध्ये समूह पुनर्विकास योजनेद्वारे योजनाबद्ध गृहनिर्मिती करण्यासाठी शासनातर्फे प्रयत्न केले जात असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. पुणे येथे देखील समूह पुनर्विकास योजना राबवण्याचे सुतोवाच श्री. शिंदे यांनी केले.
उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार म्हणाले की, मानवी हस्तक्षेपविरहित संपूर्णतः ऑनलाइन अशा या संगणकीय प्रणालीद्वारे ही सोडत प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या नूतन प्रणालीनुसार अर्ज नोंदणीकरण व पात्रता निश्चिती झाल्यानंतरच अर्जदार सोडत प्रक्रियेत सहभागी होतो. सोडतीत विजेता ठरल्यानंतर, अर्जदारास सूचना पत्र पाठविले जाते व त्यातील तरतुदींची पूर्तता केल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्पुरते देकार पत्र पाठविले जाते. ही सर्व प्रक्रिया अत्यंत सोपी व सुलभ पारदर्शक असून त्यासाठी कुठलाही मध्यस्थ/दलाल म्हाडाने नेमलेला नाही. म्हाडाचा लाभार्थी ही म्हाडासाठी मोठी गुंतवणूक असून सदर लाभार्थी हेच म्हाडाचे ब्रँड अँबेसिडर आहेत. सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.
श्री. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुणे मंडळाने मोठ्या प्रमाणात परवडणारी घरे उपलब्ध करून दिल्याचे सांगितले.
म्हाडाच्या @mhadaofficial या अधिकृत यूट्यूब व फेसबूक समाजमाध्यम व्यासपीठांवरुन सोडतीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. सदर थेट प्रक्षेपण ४८,००० जणांनी बघितले.
सोडतीमधील विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर सायंकाळी ६.०० वाजता प्रसिद्ध केली जाणार असून विजेत्या अर्जदारांना एसएमएसद्वारेही विजेता ठरल्याबाबतची माहिती तात्काळ कळविली जाणार आहे.
यावेळी ठाणे जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे, म्हाडा पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे, उपमुख्य अभियंता सुनील ननावरे,अनिल अंकलगी, मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी सविता बोडके, उपमुख्य अधिकारी अतुल खोडे, उपअभियंता मनीषा मोरे आदी उपस्थित होते.
000