Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
विकास कामांवर जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करावा; कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्णच असावीत – पालकमंत्री मेघना बोर्डीकर – महासंवाद
परभणी, दि. 29 (जिमाका) :- जिल्ह्यातील विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेचा संपूर्ण निधी वेळेत खर्च करावा. सर्व कामे ही दर्जेदार व गुणवत्तापूर्णच असावीत. निधी परत जाणार नाही, यांची विभागप्रमुखांनी दक्षता घ्यावी, अशी सूचना राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस खासदार फौजिया खान, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजेश विटेकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नतिषा माथूर, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, महानगर पालिका आयुक्त धैर्यशील जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा नियोजन अधिकारी किशोरसिंग परदेशी आदींसह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
परभणी जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील, असे सांगून पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या की, जिल्हयाच्या विकासात जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीचा मोठा वाटा असतो. या निधीच्या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लागतात. त्यामुळे निधी वेळेत खर्च होईल याची सर्वांनीच दक्षता घ्यावी. शेती, शिक्षण, आरोग्य क्षेत्राच्या विकासावर अधिक भर देण्यात यावा. कामे ही दर्जेदारच असावीत. एकाच कामासाठी वेगवेगळया योजनेतून प्राप्त निधी खर्च झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यास संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येईल. शाळा, अंगणवाडयाच्या दुरुस्तीसाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी द्याव्यात. सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हयातील सर्वच शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत. यात्रा स्थळांच्या विकासातंर्गत संवर्धनासाठी जिल्हयातील प्राचीन मंदिरं, महत्त्वाची स्थळे, यात्रेची महत्त्वाची ठिकाणे यांचा प्राधान्याने प्रस्तावात समावेश करावा. ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याच्या प्रलंबित योजना तातडीने मार्गी लावाव्यात. रेशीम शेती, फळबाग लागवडीच्या क्षेत्रात वाढ करावी, यासाठी शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्ती, वीज वितरण व्यवस्था सुरळीत करणे, ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती याकडेही प्राधान्याने लक्ष देऊन कामे वेळेत पूर्ण करावीत. मानव निर्देशांकात आपला जिल्हा अग्रेसर राहिल, याची सर्व विभागप्रमुखांनी दक्षता घ्यावी, असे पालकमंत्री यांनी सूचित केले.
खासदार फौजिया खान यांनी गड, किल्ले, महत्त्वाची स्मारके यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्यात यावा. अंगणवाडया दुरुस्ती प्राधान्याने करण्याबरोबरच सर्व कामे पारदर्शक व दर्जेदार करण्याचे सूचित केले. आमदार गुट्टे यांनी ग्रामीण भागात ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती, नियमित वीज पुरवठा, घरकुलांसाठी रेती उपलब्धता, रुग्णवाहिकेचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली.
प्रस्तावना जिल्हा नियोजन अधिकारी श्री. परदेशी यांनी केली. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 2024-25 अंतर्गत रु. 345 कोटी निधी मंजूर आहे. त्यापैकी 138 कोटी निधी प्राप्त झाला असून 73 कोटी 97 लक्ष निधी खर्च झाला आहे. सन 2025-26 साठी अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी 835 कोटी 67 लक्ष नियतव्यय प्रस्तावित केला आहे. कमाल आर्थिक मर्यादेनुसार प्रस्तावित नियतव्यय 295 कोटी आहे. अतिरिक्त मागणी 540 कोटी 64 लक्ष इतकी आहे.
प्रारंभी बैठकीत विषयसूचीप्रमाणे दि. 3 व 25 ऑगस्ट 2024 रोजी संपन्न झालेल्या बैठकीतील मुद्यांबाबत अनुपालन अहवालास मान्यता देण्यात आली. मागील व चालू वर्षातील मंजूर कामांचा आढावा घेण्यात आला. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 च्या प्रारुप आराखडयाचा मान्यतेच्या अनुषंगाने सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.
००००