Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पारदर्शी, गतिमान प्रशासनाचा संकल्प करा – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद

19

अमरावती, दि. 31 (जिमाका) : जिल्ह्याच्या विकासासाठी शाश्वत विकासाचे ध्येय, जिल्ह्याचा संकल्प आणि पायाभूत सुविधांवर भर दिला जाईल. यासाठी सर्वांनी गतिमान, पारदर्शी प्रशासनाचा संकल्प करावा. असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हा नियोजन भवन येथे आज आयोजित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.  या़त जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीत विविध विकासकामांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली, तसेच नाविण्यपूर्ण प्रकल्पांवरही चर्चा झाली. तसेच जिल्हा नियोजनचा निधी वेळेत खर्च होण्यासाठी सात दिवसांच्या आत प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

खासदार बळवंत वानखडे, आमदार किरण सरनाईक, सुलभा खोडके, रवी राणा, प्रवीण तायडे, उमेश उर्फ चंदू यावलकर, राजेश वानखडे, केवलराम काळे, गजानन लवटे, प्रवीण पोटे पाटील, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत मस्के आदी यावेळी उपस्थित होते. बैठकीत प्रास्ताविकेत जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांची माहिती दिली.

बैठकीत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतर्गत सन 2024-25 मधील जानेवारीअखेर झालेल्या 330.72 कोटी रुपयांच्या खर्चाला बैठकीत मान्यता देण्यात आली. अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 56.55 कोटी रुपये, तर आदिवासी घटक कार्यक्रमासाठी 40.99 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली.

वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीमध्ये विविध विकासकामांना चालना देण्यासाठी भरीव तरतुद करण्यात आली. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासासाठी 21.45 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून 83 कामे पूर्ण होणार असून 40.31 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार होतील. इतर जिल्हा मार्गांसाठी 14.14 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ज्यामुळे 28 किलोमीटर रस्त्यांची सुधारणा होईल. जिल्ह्यातील 14 नगरपालिका, नगरपंचायती आणि महानगरपालिकेच्या विकासासाठी 11.83 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्युत विकासासाठी 30 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे, ज्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील ऊर्जा उपलब्धता सुनिश्चित होईल. प्राथमिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांसाठी निधी प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात आला आहे.

यावेळी पुढील वर्षीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या अर्थसंकल्पावरही बैठकीत चर्चा झाली. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणसाठी 417.78 कोटी रुपये, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी 102 कोटी रुपये, तर आदिवासी उपयोजना घटक कार्यक्रमासाठी 117.38 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. सर्व कामे वेळेत आणि उच्च दर्जाची पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासकीय यंत्रणांना देण्यात आले आहेत.

महानगरपालिका स्थानिक स्वराज्य केंद्र व राज्य शासनाच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था महत्त्वपूर्ण आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शहरात सर्वत्र लवकरच सीसीटीव्ही लावण्यात येतील. चिखलदरा स्कायवॉकच्या काम गतीने पूर्ण करण्यात येईल. मंजूर कामांवरील निधी 31 मार्च 2025 च्या आत खर्च करावा. जिल्हा शल्य चिकित्सा तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी अचलपूर येथील आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी अहवाल सादर करावा. मेळघाटातील दुर्गम 22 गावांमध्ये वीज प्रश्न असल्याने याठिकाणी वीज पुरवठा सुरूळीत सुरू रहावा, यासाठी महावितरणने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

महापालिकेसाठी नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी मनपा आयुक्त यांनी इमारतीच्या बांधकामाचे अंदाजपत्रक तयार करुन कार्यवाही करावी. तसेच महानगरपालिकेच्या शाळा अत्याधुनिक करण्यावर भर द्यावा. मनपा शाळा डिजिटल तसेच आधुनिक तंत्रज्ञानानेयुक्त व्हाव्यात यासाठी 16 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात अला. शाळा, तसेच आरोग्य सेवेकडे विशेष लक्ष द्यावे, असे पालकमंत्री म्हणाले.

आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत जिल्ह्यातील नदी, उपनद्या, नाले खोलीकरण करून पाणी जिरवण्यावर भर द्यावा. उपसा करताना निघालेली वाळू शासकीय इमारतीच्या बांधकामासाठी वापरावी. गाव तेथे स्मशानभूमी ही योजना प्रत्येक गावात असणे आवश्यक आहे. तसेच मोर्शी मतदारसंघातील वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताबाबत तोडगा काढण्यात येणार असल्याचे सांगितले.

पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी अंबादेवी आणि एकवीरा देवीचे आज सकाळी दर्शन घेतले. यावेळी मंदिर संस्थानाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी श्री. वैद्य यांनी श्री. बावनकुळे यांचा हनुमानाची मूर्ती भेट देऊन सत्कार केला. श्री बावनकुळे यांनी क्रीडापटूंची माहिती घेऊन कौतुक केले.

ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक एकनाथ हिरुळकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांचे पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी भेट देऊन सांत्वन केले. यावेळी श्री. बावनकुळे यांनी महात्मा गांधी आणि स्व. एकनाथ हिरुळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी कंवर नगर येथील महानुभव आश्रमाला भेट दिली. आश्रमाच्या वतीने त्यांचा  यावेळी सत्कार करण्यात आला.

पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी आज सकाळी भेट दिली. समाधीस्थळी त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच समाधीस्थळाचा विकास ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनीसांगितले. यावेळी आश्रमाच्यावतीने श्री. बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.