Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुंबई, दि. ११: केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी ‘एल्डरलाईन – १४५६७’ ही राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाईन सुरू केली आहे.
राज्यात राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान (एनआयएसडी), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चालविण्यात येते.
या हेल्पलाईनचे काम २६ जानेवारी, १५ ऑगस्ट व २ ऑक्टोबर वगळता वर्षातील ३६२ दिवस आणि आठवड्याचे सर्व दिवस सकाळी ८ ते संध्याकाळी ८ पर्यंत चालते. याद्वारे आरोग्यविषयक जागरूकता, वृद्धाश्रम, डे केअर सेंटर, पोषण, सांस्कृतिक, कला, ज्येष्ठांसंबंधी अनुकूल उत्पादने, आणि मनोरंजनाशी संबंधित माहिती पुरविण्यात येते.
वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावर कायदेविषयक, मालमत्ता, शेजारी आदींच्या अनुषंगाने वाद निराकरण, आर्थिक, निवृत्तीवेतन संबंधित सल्ला आणि सरकारी योजनांच्या माहितीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात येते. चिंता निराकरण, नातेसंबंध व्यवस्थापन, मृत्यूशी संबंधित भीती निवारण, वेळ, ताण, राग आदीच्या अनुषंगाने जीवन व्यवस्थापन, मृत्युपत्र बनवण्याचे महत्त्व आदी मृत्यूपूर्वीचे दस्तऐवजीकरण आदी अनुषंगाने ही मदत करण्यात येते.
यासंदर्भात राज्यभरातून जेष्ठ नागरिकांसाठी चार लाखाहून अधिक मदतीचे दूरध्वनी आले आहेत. त्यामध्ये जेष्ठ नागरिकांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या मदत हेल्पलाईनने केली आहे. तसेच तीस हजाराहून अधिक प्रकरणे क्षेत्रीय पातळीवर यशस्वीरित्या हाताळली आहेत.
०००
शैलजा पाटील/विसंअ/