Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
दिल्लीतील ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन -डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते कवी कट्ट्याचे उद्घाटन
नवी दिल्ली दि.२२ : दिल्ली येथे सुरू असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी (२३ फेब्रुवारी २०२५) महात्मा ज्योतिराव फुले सभामंडपात “कवी कट्ट्याचे” उद्घाटन महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी कवी कट्ट्याचा वर्षांचा प्रवास उलगडून दाखवला आणि मराठी साहित्याच्या संवर्धनासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे समन्वयक राजन लाखे व गोपाळ कांबळे यांनी समन्वयाची जबाबदारी पार पाडली. प्रारंभी राजन लाखे यांच्या प्रास्ताविकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी मराठी भाषा संचालनालयाचे संचालक डॉ. शामकांत देवरे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाहक ॲड. प्रमोद अदरकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष रवींद्र शोभणे उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि मराठी साहित्याच्या वाढीसाठी कवी कट्ट्याच्या उपक्रमाचे कौतुक केले.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या भाषणात कवी कट्ट्याचा वर्षांचा प्रवास, मराठी भाषा, साहित्य, आणि मराठीला अभिजात दर्जा मिळण्याच्या संघर्षाचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या, “कवी कट्ट्याच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे दरवर्षी मंडपाचा आकार वाढवत न्यावा लागतो, ही अत्यंत आनंदाची बाब आहे.”
त्यांनी महिला आणि साहित्य यांचा परस्पर संबंध, तसेच साहित्यिकांना भेडसावणाऱ्या अडचणींवरही प्रकाश टाकला. त्यांनी ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांचे उदाहरण देत साहित्यसेवेसाठी कुटुंबीयांनी दिलेल्या पाठिंब्याचे महत्त्व अधोरेखित केले.
साहित्यिक चळवळींना बळ देण्याचा संकल्प
महिलांचे साहित्य संमेलन आणि बालकवी संमेलन आयोजित करणे, सर्व कवींना एकत्र आणणारे अखिल भारतीय कवी संमेलन भरवणे, विद्यापीठांच्या धर्तीवर साहित्य विश्वात माजी कवी-सदस्य (Alumni) संकल्पना राबवणे असे म्हणत डॉ. गोऱ्हे यांनी कवी कट्ट्याच्या पुढील वाटचालीसाठी हे महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडले.
कवितेच्या माध्यमातून सामाजिक जाणिवा
डॉ. गोऱ्हे यांनी त्यांच्या काही कविता सादर करताना लोकशाही, सामाजिक जाणीव आणि सत्यासोबत राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
ग्रंथदालनास भेट आणि समारोप
उद्घाटन समारंभानंतर डॉ. गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनात लावलेल्या पुस्तक प्रदर्शनाला भेट देऊन प्रकाशक, लेखक आणि वाचकांशी संवाद साधला.