Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मावळ तालुक्यातील रस्ते, पाणीयोजना, आरोग्यकेंद्रांची कामे तातडीने मार्गी लावावित – उपमुख्यमंत्री अजित पवार – महासंवाद

कार्ल्यातील श्रीएकवीरा मंदिर परिसरातील विकासाची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
मावळमधील महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते रुंदीकरण व उड्डाणपुलांसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार
पर्यटक आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी लोणावळा व कार्ल्यात पर्यटक पोलिस ठाणे
मुंबई, दि. 27 :- पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील लोणावळा व वडगाव (कान्हे) उपजिल्हा रुग्णालयांची कामे गतीने पूर्ण करावी. मौजे जांभूळ येथील क्रीडा संकूल सर्व सुविधायुक्त, मावळ तालुक्याचा गौरव वाढवणारे असावे, देहू नगरपंचायतीसह, खडकाळे, वराळे, डोणे आढळे, डोंगरगाव कुसगाव, पाटण, कार्ला व परिसरातील पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण कराव्यात. मौजे कार्ला येथे फनिक्युलर रोपवे उभारण्यासह श्रीएकवीरा मंदिर परिसराच्या विकासाची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
लोणावळ्यातील पर्यटकांची आणि कार्ला येथील भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन दोन्ही ठिकाणी सुरक्षेच्यादृष्टीने पर्यटन पोलिस ठाणी स्थापन करण्यात येतील. महामार्गांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तळेगाव, चाकण, शिक्रापूर परिसरातल्या महामार्गाचे रुंदीकरण, महामार्गावर उड्डाणपूल उभारण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्यात येईल, यासाठी मी स्वत: पुढाकार घेईन, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बैठकीत स्पष्ट केले.
पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील विकासप्रकल्पांच्या अंमलबजावणीतील अडचणी दूर करुन या प्रकल्पांना गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर (व्हीसीद्वारे), स्थानिक आमदार सुनील शेळके यांच्यासह नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, वित्त व नियोजन, पाणीपुरवठा- स्वच्छता, आरोग्य, एमएसआरडीसी, एमएसआयडीसी, गृह, क्रीडा आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी, पुण्याचे जिल्हाधिकारी, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय तसेच पुणे ग्रामीण पोलीसचे वरिष्ठ अधिकारी (व्हीसीद्वारे) उपस्थित होते.
म्हणाले की, कार्ला येथील आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात. मंदिर परिसरात भाविकांना चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी मंदिर परिसराच्या विकासाची कामे करण्यात येत आहेत. वेहेरगाव येथील श्रीएकवीरा देवी मंदिर येथे फनिक्युलर रोपवे उभारण्यासंदर्भातील कामांना मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पामुळे भाविकांना अल्पावधीत मंदिरात पोहोचता येणार आहे. प्रकल्पाची गतीने उभारणी करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.
लोणावळा व वडगाव (कान्हे) उपजिल्हा रूग्णालयाचे सुरुवातीच्या टप्प्यांचे बांधकाम तातडीने पूर्ण करावे. उर्वरित कामांचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तालुका क्रीडासंकुल बांधण्यासाठी मावळ तालुक्यातील मौजे जांभुळ येथे 2 हेक्टर 60 आर क्षेत्र मंजूर करण्यात आले आहे. यात कबड्डी, खोखो, व्हॉलीबॉल, फूटबॉल, टेनिस, धावपट्टी, प्रेक्षागार आदी सोयीसुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. ही कामे मंजूर निधीतून तातडीने सुरु करावीत, ज्या कामांना अतिरिक्त निधी लागेल तो तातडीने उपलब्ध केला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती द्यावी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत मंजूर डोणे आढळे, वाढीव डोंगरगाव कुसगाव, पाटण व ८ गावे, कार्ला व ७ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, खडकाळे, वराळे, देहू नगरपंचायत पाणीयोजनांच्या कामांच्या सद्यस्थितीचाही आढावा घेतला. या सर्व पाणी योजनांच्या कामांना गती द्यावी, असे निर्देश दिले.
000