Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
जिल्हा वार्षिक योजनेतून प्रस्तावित कामे विहीत कालावधीत पूर्ण करा – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले – महासंवाद
- जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक
- विकास कामे दर्जेदार होण्यासाठी खबरदारी घ्या
लातूर, दि. २८ : जिल्हा वार्षिक योजनेतून प्रस्तावित करण्यात आलेली कामे विहीत कालावधीत पूर्ण करण्यासाठी सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी प्राधान्य द्यावे. तसेच ही कामे दर्जेदार होतील, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख, प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून प्रस्तावित कामे पूर्ण होणे आवश्यक आहे. या कामांसाठी तरतूद करण्यात आलेला निधी समर्पित होणार नाही, याची खबरदारी सर्वांनी घ्यावी. तसेच नागरिकांच्या जीवनाशी थेट निगडीत असलेल्या कामांना प्राधान्य देवून ही कामे दर्जेदार आणि विहित कालावधीत होतील, यासाठी नियमितपणे आढावा घेवून आवश्यक कार्यवाही करावी. महावितरणने विद्युत रोहित्र दुरुस्ती, विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती आदी कामांना गती द्यावी, असे पालकमंत्री ना. भोसले यावेळी म्हणाले.
ऐतिहासिक गंजगोलाई परिसरातील सुशोभिकरण करताना मूळ वास्तूच्या सौंदर्यात भर पडेल, वाहतूक सुरळीत होईल, या दृष्टीने आराखडा तयार करावा. तसेच लातूरसह जिल्ह्यातील प्रमुख शहरामध्ये गर्दीच्या ठिकाणी स्वच्छतागृहे उपलब्ध होण्यासाठी आराखडा तयार करावा. लातूर शहरातील बंद अवस्थेत असलेली स्वच्छतागृहे सुरु करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, असे पालकमंत्री ना. भोसले यांनी सांगितले.
गेल्या दोन वर्षात जिल्हा वार्षिक योजनेतून प्राप्त निधी विहित कालावधीत खर्च झाला आहे. या आर्थिक वर्षातही विहित कालावधीत निधी खर्च होण्यासाठी नियोजन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून प्राप्त निधी, वितरीत निधी आणि आतापर्यंत झालेल्या खर्चाची माहिती सादर केली. तसेच सन २०२५-२६ मध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या प्रमुख कामांचे सादरीकरण केले.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत उद्दिष्टपूर्तीबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचा सन्मान
राज्य शासनामार्फत प्राप्त उद्दिष्टापेक्षा अधिक लाभार्थ्यांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ देवून त्यांचे उद्योजक, व्यावसायिक बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास पाठबळ देत लातूर जिल्ह्याने गतवर्षी प्रथम क्रमांक पटकाविला होता. यावर्षीही जिल्ह्याने राज्य शासनाकडून प्राप्त उद्दिष्ट पूर्ण केले असून या कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रवीण खडके यांचा पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात मंजुरी पत्राचे वितरण करण्यात आले.