Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- नागपूरमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेचा आलेख घसरला
- करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट
- म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भावही झाला कमी
करोनाचा विळखा पडल्याच्या संशयातून मंगळवारी जिल्ह्यातून तपासलेल्या ७८१८नमुन्यांमध्ये ७७७२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
हा सगळा घटनाक्रम सुरू असताना आज दिवसभरात उपचार घेत असलेले २८१ अॅक्टिव्ह रुग्ण ठणठणीत बरे झाले. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत आजारमुक्त होणाऱ्यांची संख्याही सहा पटीने वाढली आहे. मात्र मंगळवारी दिवसभरात शहरातील २ आणि अन्य जिल्ह्यातून उपचाराला आलेल्या एका कोव्हिड बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. ग्रामीण भागातून आज पुन्हा एकाही करोनाबाधिताचा मृत्यू ओढवला नाही. या विषाणूने आजवर जिल्ह्यातील ९०१० कोविडग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत.
अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत घट
नव्याने कोविडचे निदान होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. या तुलनेत पाच ते सहा पट करोनाबाधित बरे होत आहेत. त्यामुळे अॅक्टिव्ह रुग्णसंख्याही वेगाने कमी होत आहे. मंगळवारी शहरात १३७२ तर ग्रामीण भागातील १६० अशा एकूण १५३२ अॅक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.
म्युकरमायकोसिसची काय आहे स्थिती?
करोनाची साखळी भेदल्यानंतरही ब्लॅक फंगस अर्थात काळ्या बुरशीच्या कचाट्यात अडकणाऱ्या रुग्णसंख्येतही मंगळवारी घट झाल्याचं पाहायला मिळालं. आज दिवसभरात नागपुरातील ९ आणि वर्धेतील २ अशा ११ नव्या म्युकरमायकोसिस बाधितांची नोंद विभागामधून घेण्यात आली. तर उपचारादरम्यान २ जणांनी जीव सोडला.
कोविडवर मात करून बाहेर पडलेल्या १६४७ जणांना आतापर्यंत या काळ्या बुरशीच्या संसर्गाने गाठल्याचे निदान करण्यात आले. त्यातील १४१८ रूग्ण नागपूर जिल्ह्यातील आहेत. वर्धेत आतापर्यंत ११८, चंद्रपुरात ९४ तर भंडारात १७ जणांना या बुरशीचे संक्रमण झाले आहे. हा आजार जडलेल्यांपैकी आतापर्यंत विभागातून १३७ जणांना प्राण गमवावे लागले आहेत.
म्युकरमायकोसिसचे निदान झालेल्यांपैकी मंगळवारपर्यंत ११३१ जणांवर वेगवेगवळ्या प्रकारच्या शल्यक्रिया करून त्यांच्या शरीरात पसरलेली बुरशी काढून टाकण्यात आली. या खेरीज ५९१ रुग्णांवर विभागातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. करोनासोबतच आता विभागातून ९२४ ब्लॅक फंगस बाधित रुग्णांनी याही आजारावर मात केली आहे.