Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- उदयनराजे भोसले यांनी घेतली हसन मुश्रीफ यांची भेट.
- मुंबईतील निवासस्थानी झाली दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा.
- भेटीनंतर उदयनराजे यांनी केले मुश्रीफ यांचे कौतुक.
वाचा:शिवसेना-राष्ट्रवादी युतीचा ‘नगर’नामा!; मुंबईतील बैठकीत झाला मोठा निर्णय
उदयनराजे भोसले हे आपल्या सडेतोडपणासाठी ओळखले जातात पण तितकेच ते दिलदारही आहे. सक्रिय राजकारणात राहताना त्यांनी विविध पक्षांतील नेत्यांशीही जिव्हाळ्याचे संबंध राखले आहेत. त्याचा प्रत्यय नेहमीच येतो. आता उदयनराजे आणि हसन मुश्रीफ यांच्या भेटीच्या निमित्ताने उदयनराजेंचा दिलदारपणा पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर उदयनराजे भाजपात गेले. भाजपकडून साताऱ्यात लढताना त्यांना राष्ट्रवादीकडून पराभव पत्करावा लागला. श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे यांना मात दिली. हा पराभव अत्यंत खिलाडूवृत्तीने स्वीकारत त्यांनी राष्ट्रवादीतील नेत्यांशी असलेली मैत्री मात्र आजही जपली आहे, हे मुश्रीफ-उदयनराजे भेटीत पाहायला मिळाले.
वाचा: आर्थिकदृष्ट्या मागासांसाठी महत्त्वाची बैठक; अजित पवारांनी दिल्या ‘या’ सूचना
सार्वजनिक कामांच्या निमित्ताने उदयनराजे यांनी मुंबई येथील निवासस्थानी कोल्हापूरकर हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. या भेटीनंतर उदयनराजे यांनी मुश्रीफ यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. हसन मुश्रीफ हे गोरगरिबांना न्याय देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. मुश्रीफ यांची काम करण्याची स्वतःची अशी एक वेगळी स्टाइल आहे, असे उदयनराजे म्हणाले. यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने हेही उपस्थित होते.
दरम्यान, कोल्हापूरच्या राजकारणात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यात विस्तवही जात नाही. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशावेळी भाजपचे राज्यसभा सदस्य उदयनराजे यांनी घेतलेली मुश्रीफ यांची भेट अधिक महत्त्वाची ठरली आहे. त्यातच उदयनराजे यांनी मुश्रीफ यांचे मुक्तकंठाने कौतुक केल्याने भाजपच्या गोटातून दबक्या आवाजात का होईना याबाबत नाराजी उमटणार आहे.
वाचा: महामंडळ वाटपाचा मुद्दा ऐरणीवर; महाविकास आघाडीत मात्र मतभेद?