Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Nana Patole: ‘काँग्रेसने संविधानाचे रक्षण केले म्हणून आज चहावाला पंतप्रधान होऊ शकला’

18

हायलाइट्स:

  • मोदी यांनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धूळीस मिळवली!
  • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पुन्हा टीकास्त्र
  • भाजपातील अनेक नेते काँग्रेसमध्ये येण्यास इच्छूक.

शिरपूर (धुळे): केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला लोकशाही मान्य नाही. त्यांचा कारभार ठोकशाही पद्धतीने चालतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले, या संविधानाचे रक्षण करण्याचे काम काँग्रेसने केले म्हणून एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला. परंतु, सत्तेत आल्यापासून मोदींनी सर्व व्यवस्थाचा मोडीत काढली आहे. देशाचा पंतप्रधान हे सर्वोच्च व सन्मानाचे पद आहे मात्र नरेंद्र मोदी यांनी या पदाची प्रतिष्ठा धूळीस मिळवली आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी टीकास्त्र सोडले. भाजपमधून अनेक नेते काँग्रेसमध्ये येण्यास इच्छूक असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. ( Nana Patole Targets Pm Modi )

वाचा:धोका पत्करू नका!; निर्बंधांबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांचे महत्त्वाचे निर्देश

शिरपूर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. नाना पटोले पुढे म्हणाले की, मोदी सरकारने करोना संकटात देशातील जनतेला वाऱ्यावर सोडून दिले. लोक तडफडून मरत असताना मोदी पश्चिम बंगाल मध्ये प्रचारात व्यस्त होते. लसीकरण मोहिमेच्या अपयशाने मोदींचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे. देशातील जनतेला लसींची गरज असताना मोदींनी पाकिस्तान सारख्या शत्रू राष्ट्राला मोफत लस दिली आणि देशातील लोकांना मात्र लस विकत घेण्यासाठी भाग पाडले जात आहे. लसीकरण मोहीम फसली आहे परंतु, प्रसिद्धीचा हव्यास लागलेल्या मोदींनी लसीकरणाचे श्रेय घेण्यासाठी कॉलेजमध्ये स्वत:ला धन्यवाद देणारे पोस्टर्स व होर्डींग्स लावण्याचे फर्मान काढले आहे. लोकशाही मध्ये फर्मान कसे काय काढले जाऊ शकते? मोदी सरकार हे सामान्य लोकांचे, शेतकरी, कष्टकरी लोकांचे सरकार नाही. जनता महागाईत होरपळत आहे. शेजारच्या श्रीलंका, भूतान, नेपाळमध्ये पेट्रोल ६०-६५ रुपये लिटर आहे आणि आपल्याला मात्र त्यासाठी १०० रुपये मोजावे लागत आहेत. भरमसाठ कराच्या रुपाने मोदी सरकार जनतेच्या खिशावर दरोडा टाकत आहे.

वाचा: ‘अनेकजण अनेक रंग दाखवताहेत, ते रंग बघावे लागतात’; मुख्यमंत्र्यांचा टोला

भारतीय जनता पक्षातील अनेक आजी माजी आमदार, नेते हे काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्यास इच्छूक आहेत. मध्यंतरी भाजपाने सीबीआय, ईडी सारख्या केंद्रीय यंत्रणामार्फत दबाव आणून अनेकांना भाजपात प्रवेश करण्यासाठी भाग पाडले. ते भाजप मध्ये गेले असले तरी मनाने काँग्रेसमध्येच आहेत. त्यांच्या मनातून काँग्रेस जात नाही, असे अनेक जण काँग्रेस मध्ये येण्याच्या तयारीत आहेत, असा दावा नाना पटोले यांनी केला. धुळे, नंदुरबार जिल्हे काँग्रेस विचारांना मानणारे आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा नारळ याच धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत फोडला जातो. काँग्रेस पक्ष हा आदिवासी, दलित, वंचित, सामान्य लोकांना न्याय देणारा पक्ष आहे. म्हणून स्वातंत्र्याची जशी चळवळ उभी राहिली होती तशीच चळवळ पुन्हा उभी करून काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून द्यायचे आहे, असे आवाहन पटोले यांनी केले. उत्तर महाराष्ट्र दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पटोले यांनी शिरपूर, शिंदखेडा, दोंडाईचा येथील काँग्रेस कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी कार्यकर्ते व शेतकरी यांच्याशी त्यांनी संवाद साधला. करोना संकटात आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र काम केलेल्या आशा सेविकांचा दोंडाईचा येथे नाना पटोले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे, प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील, धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शाम सनेर आदी उपस्थित होते.

वाचा: देवेंद्र फडणवीस-जितेंद्र आव्हाड यांच्यात गुप्त बैठक, चर्चा तर होणारच!

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.