Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- सोलापुरात गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आक्रमक
- राष्ट्रवादीच्या कार्यालयावर केली दगडफेक
- दगडफेकीनंतर दोन कार्यकर्ते पोलिस स्टेशनमध्ये हजर
भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर (BJP Gopichand Padalkar) यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीचे आता सोलापुरात पडसाद उमटले आहेत. शहरातील रामलाल चौक येथे असलेल्या सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी पक्षाच्या भवनावर आमदार पडळकर यांच्या दोन समर्थकांनी गुरुवारी दुपारी दगडफेक करून कार्यालयाचे नुकसान केले.
राष्ट्रवादीचे कार्यालय बंद होते, मात्र खिडकीतून दगडाने काचा फोडण्याचा प्रयत्न पडळकर समर्थकांकडून करण्यात आला. तसंच दरवाजावरही दगडाने प्रहार करण्यात आले. त्यानंतर एकच छंद गोपीचंद अशा घोषणा देत दगडफेक केलेले दोन कार्यकर्ते स्वतःहून पोलिसात जाऊन हजर झाले.
या घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कमलाकर पाटील घटनास्थळी आले. त्यावेळी खिडक्यांमध्ये अडकलेल्या दगडांचे त्यांनी फोटो काढले. दगडफेक करणाऱ्या दोन्ही कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
पडळकर Vs राष्ट्रवादी वाद
सोलापुरातील पत्रकार परिषदेत बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्रमक भाषेत टीका केली होती. त्यानंतर सोलापुरातच बुधवारी मड्डी वस्ती येथे घोंगडी बैठकीला आल्यावर पडळकर यांच्या गाडीवर एका तरुणाकडून दगडफेक करून नुकसान करण्यात आले. हा तरुण राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता पडळकरांचे समर्थकही आक्रमक झाले असून त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयावर हल्लाबोल केला.
दरम्यान, एकंदरीतच दोन्ही बाजूच्या आक्रमक समर्थकांमुळे हा वाद आणखीनच चिघळला असून सर्वांनी संयमाची भूमिका घेण्याची गरज असल्याचं मत सर्वसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.