Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कोविड सेंटरसाठी जगभर नावाजलेल्या ‘या’ तालुक्यात करोना पाठ सोडेना

74

हायलाइट्स:

  • नगर जिल्ह्यातील करोनाचा संसर्ग आटोक्यात
  • पारनेर तालुक्यातील रुग्णसंख्या मात्र वाढतीच
  • कोविड सेंटरची अत्याधुनिक सुविधा असूनही परिस्थिती बदलेना

अहमदनगर: राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांच्या पुढाकारातून पारनेरमध्ये राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या नावाने कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून आमदार लंके यांनी केलेली रुग्ण सेवा, कोविड सेंटरमध्ये राबविलेले विविध उपक्रम याची देशातच नव्हे तर जगात चर्चा झाली. मदतीचा ओघही आला. नेत्यांच्या भेटी झाल्या. असे असले तरी पारनेर तालुक्यातील करोना रुग्णांचे आकडे मात्र कमी होताना दिसत नाहीत. गेल्या काही काळापासून नगर जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण पारनेर तालुक्यात आढळून येत आहेत. (Corona Cases increasing in Parner taluka of Ahmednagar)

कोविड सेंटरच्या माध्यमातून रुग्णांवर चांगले उपचार झाले असतीलही, मात्र हे करीत असताना तालुक्यात करोनाचा प्रसार रोखण्याकडे मात्र, दुर्लक्ष झाल्याचे यातून दिसून येत आहे. राज्यातील करोनाचे आकडे खाली येत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातही करोनाची साथ अटोक्यात आली आहे. सुरुवातीला गंभीर परिस्थिती बनलेल्या संगमनेर, नगर शहर, नेवाशाची स्थिती सुधारली असली तरी गेल्या आठ दिवसांपासून पारनेर मात्र जिल्ह्यात आघाडीवर आहे. जिल्ह्यातील नव्या रुग्णांचे आकडे आता चारशे ते पाचशेच्या दरम्यान आहेत. मात्र, तालुक्यांमध्ये पारनेरचा आकडा सर्वाधिक असल्याचे दिसून येते.

वाचा:पडळकरांना आवरा, रोहित पवारांची थेट मोदींकडे तक्रार

गेल्या आठवड्यात पारनेरला सातत्याने सर्वाधिक रुग्ण आढळून आले. पारनेर तालुक्यात २८ ते ३० जून या काळात जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण होते. या काळात ३५ ते ५७ दरम्यान रुग्ण संख्या होती. ग्रामीण भागात रुग्णांची संख्या जास्त आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत पारनेरची लोकसंख्या कमी आहे. तरीही तेथे जास्त रुग्ण आढळून येत आहेत. अहमदनगर शहरात मात्र, कडक निर्बंध पाळून संख्या कमी करण्यात प्रशासनाला यश आले. त्यामुळे गेला आठवडाभर येथे एक अंकी रुग्ण संख्या आहे. त्या तुलनेत पारनेरमधील रुग्ण संख्या लक्षणीय आहे.

वाचा: ‘मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही ते आता केंद्रानं ठरवावं’

करोनाच्या सुरुवातीपासूनच पारनेरचे आमदार लंके यांचे सेवाकार्य गाजत आहे. दुसऱ्या लाटेत एक हजार बेडचे कोविड सेंटर उभारून त्यांनी स्वत: तेथे तळ ठोकून रुग्ण सेवा केली. त्यांच्या कामाची सर्वदूर दखल घेतली गेली. अनेक मंत्री आणि नेत्यांनीही या सेंटरला भेटी दिल्या. देशविदेशातून देणग्या मिळाल्या. त्यातून कोविड सेंटरमधील रुग्णांवर आनंददायी उपचार करण्यात आले. अद्यापही हा उपक्रम सुरू आहे. असे असले तरी तालुक्यातील संसर्ग थोपविण्याकडे मात्र यंत्रणेला यश आल्याचे दिसून येत नाही. प्रशासनाकडून कारवाई केली जात असली तरी नियम पाळण्याकडे लोकांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.

वाचा: महाआघाडीच्या दिग्गजांना धक्का; कृष्णा सहकारी कारखान्यावर भाजपचं वर्चस्व

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.