Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- महावितरणच्या वीजयंत्रणेवर आता कोणताही कर अधिकार नाही
- वाढीव वीजदराच्या रुपात सर्वसामान्य वीजग्राहकांवर भुर्दंड
- ग्रामपंचायत व पालिका वीजयंत्रणेला कर आकारणीतून वगळण्याचे आदेश
महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या शासकीय कंपन्यांवर सुरळीत व शेवटच्या घटकापर्यंत वीजपुरवठा करण्याची जबाबदारी आहे. त्यासाठी वीज कंपन्या व त्यांच्या फ्रॅन्चाईजींकडून राज्यात विविध ठिकाणी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येते. यामध्ये उपरी व भूमिगत वाहिनी, वितरण रोहित्र, उपकेंद्र, विद्युत खांब व मनोरे, पारेषण वाहिन्या आदींची उभारणी करण्यात येते. या सर्व यंत्रणेवर पूर्वी संबंधीत ग्रामपंचायती, नगरपालिका व महानगरपालिकांकडून विविध कर आकारण्यात येत होते. या करांचा बोजा महावितरणसह तिनही वीज कंपन्यांच्या एकूण वार्षिक महसुलाच्या गरजेमध्ये (Aggregate Revenue Requirement-ARR) समाविष्ट करण्यात येत होता. परिणामी महसुलाच्या गरजेत वाढ होऊन या करांचा समावेश वीजदरात होत होता. पर्यायाने वीजदरात देखील वाढ होत होती.
कर आकारणीमुळे वाढीव वीजदराचा नाहक भुर्दंड सर्वच वीजग्राहकांवर येत असल्याने ग्रामपंचायत, नगरपालिका व महानगरपालिका हद्दीमध्ये उभारण्यात येणाऱ्या वीजयंत्रणेवर कोणत्याही प्रकारच्या कराची आकारणी करण्यात येऊ नये ही बाब शासनाच्या विचाराधीन होती. यासाठी संबंधीत ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिकांचे संबंधीत अधिनियम, नियम व आदेश यामध्ये आवश्यक ती सुधारणा करून शासकीय वीज कंपन्यांना कर आकारणीपासून वगळण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला व त्याप्रमाणे २० डिसेंबर २०१८ रोजी शासन आदेश काढण्यात आला आहे.
राज्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांचे वीजबिल थकीत असल्याने महावितरणकडून गेल्या काही दिवसांपासून नाईलाजाने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. दरम्यान राज्य शासनाने दि. २३ जून २०२१ च्या आदेशानुसार १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या अबंधित (अनटाइड) अनुदानातून पथदिव्यांचे वीजबिल आणि बंधीत (टाइड) अनुदानातून पाणीपुरवठा योजनांचे वीजबिल संबंधीत ग्रामपंचायतींद्वारे अदा करण्याचे आदेश दिले आहेत. तरीही राज्यातील काही जिल्ह्यात काही ग्रामपंचायतींनी महावितरणच्या वीजयंत्रणेवर कर आकारण्याचा इशारा दिला आहे. मात्र राज्य शासनाने २० डिसेंबर २०१८ रोजी महावितरणसह तिनही शासकीय वीज कंपन्यांच्या ग्रामपंचायत व पालिका हद्दीतील वीजयंत्रणेला कर आकारणीतून वगळण्याचे आदेश दिलेले आहेत.