Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

युक्रेन येथून १०२ विद्यार्थी सुखरूप परतले पुणे जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट

5

पुणे दि.०७ :- युक्रेन देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्याने भारतातून युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या १०२ विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्यात शासन व प्रशासनाला यश आले आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात युक्रेन येथील विद्यार्थिनी शाकंभरी लोंढेपाटील हिला पुष्पगुच्छ देऊन तिच्या धाडसाबद्दल अभिनंदन केले आणि तेथील परिस्थितीची माहिती घेतली.

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी शाकंभरीच्या धाडसाचे कौतुक केले. तिने प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता धैर्याने परिस्थितीला तोंड दिले. तिने अशा परिस्थितीतही इतरही देशाच्या विद्यार्थ्यांना केलेली मदत स्तुत्य आहे, असे ते म्हणाले. शांकभरीने युक्रेनमधील परिस्थितीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. प्रतिकूल परिस्थितीत मुलीने दाखविलेल्या धाडसाबद्दल तिचे कौतुक करीत शाकंभरीचे वडील शाम लोंढेपाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.

युक्रेनमधील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी केंद्र व राज्य शासन तसेच जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्नशील होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनामार्फत पालक आणि नातेवाईंकांना माहिती देण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला. जिल्हा नियंत्रण कक्षात पालकांकडून विद्यार्थ्यांची माहिती प्राप्त झाल्यावर राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाला या विद्यार्थ्यांची माहिती देण्यात आली.

नियंत्रण कक्षातर्फे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे व त्यांचे सहकारी सातत्याने विद्यार्थ्यांच्या संपर्कात होते. विद्यार्थी असलेल्या ठिकाणाबाबत माहिती घेऊन दररोज सायंकाळी मंत्रालयातील कक्षाला त्याविषयी कळविण्यात येत होते. राज्य शासनातर्फे केंद्र सरकारच्या नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती देण्यता येत होती. ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत या विद्यार्थ्यांना विमानाने भारतात आणले गेले व राज्य शासनाने त्यांना महाराष्ट्रात आणण्याची व्यवस्था केली.

युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रशासनातर्फे अभिनंदन

युक्रेनमध्ये असलेल्या १०९ विद्यार्थ्यांपैकी १०२ विद्यार्थी पुण्यात परतले असून ३ विद्यार्थी पोलंड येथे व १ विद्यार्थी ओमान या देशातील त्यांच्या पालकांकडे सुखरूप पोहोचले आहेत. इतर ३ विद्यार्थी प्रवासात असून लवकरच ते पुण्याला परततील. जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांच्या सुचनेनुसार उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी जिल्ह्यात परतलेल्या विद्यार्थ्यांची घरी जाऊन भेट घेतली व ते सुखरुप परत आल्याबद्दल अभिनंदन केले. शासन आणि प्रशासनातर्फे वेळोवेळी संपर्क करून माहिती घेण्यात येत असल्याचे यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांनी खूप धीर दिला-शाकंभरी लोंढेपाटील

मी युक्रेनच्या दक्षिण भागात रहात होते. २४ फेब्रुवारी नंतर तीन दिवस बंकरमध्ये काढले. जवळचे खाद्य संपल्याने केवळ नळाच्या पाण्यावर रहावे लागले. त्यानंतर भारत सरकार, महाराष्ट्र शासन आणि विशेष करून जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांची खूप मदत झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी दूरध्वनीद्वारे खूप धीर दिला. या सर्वांचे मी आभार व्यक्त करते.

Leave A Reply

Your email address will not be published.