Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात विविध उपक्रमांचे

5

पुणे ग्रामीण पोलीस दलाचा ‘स्मार्ट पोलीसींग’ उपक्रम राज्यात राबवा- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. २६: बदलत्या काळात पोलीसींगची संकल्पना बदलत आहे. पुणे ग्रामीण पोलीसांनी सुरू केलेला ‘स्मार्ट पोलीसींग’चा उपक्रम चांगला असून तो अधिक प्रभाविपणे आणि राज्यभरातील पोलीस दलात राबवण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केल्या.

पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात सबसिडीअरी पोलीस कँटीनचे उद्घाटन, नूतनीकृत भीमाशंकर सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन, पोलीस दलाला डायल ११२ उपक्रमांतर्गत प्राप्त झालेल्या १० चारचाकी वाहनांचे लोकार्पण श्री. पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख तसेच फियाट इंडिया कंपनीचे अध्यक्ष रवी गोगीया उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री. पवार म्हणाले, काळानुसार तंत्रज्ञानात गतीने बदल होत आहेत ही बाब चांगली आहे. परंतु काही अपप्रवृत्ती त्याचा गैरवापरही करत आहेत. त्यासाठी पोलीस दलानेही नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे. पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर दिला जात आहे. ग्रामीण पोलीस दलाला डायल ११२ साठीच्या उपक्रमासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून २०२०-२१मध्ये २ कोटी तर चालू आर्थिक वर्षात १ कोटी रुपये देण्यात आले आहेत. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच ग्रामीण पोलीस दलाला डायल ११२ उपक्रमाला वाहने घेण्यासाठी सुमारे १२ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलीस ठाणे व इतर इमारतींच्या बांधकामासाठी १५ कोटी रुपये खर्च केला जात आहे. राज्यातही याच प्रकारे जिल्हा नियोजन समितीतून पोलीस दलाला पायाभूत सुविधांसाठी निधी दिला जात आहे. नुकताच आमदारांच्या स्थानिक विकास निधीत वाढ करुन ५ कोटी रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातून १० टक्के म्हणजेच ५० लाख रुपये निधी त्या भागातील शासकीय इमारतींचे बांधकाम, दुरूस्ती आदींवर करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे, असेही ते म्हणाले. पोलीसांना घरांसाठी घरबांधणी अग्रीम देण्याची पूर्वीची योजना पुन्हा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशीही ग्वाही श्री. पवार यांनी यावेळी दिली.

पोलीस कल्याण निधीतून पाषण व बाणेर रोडवर उभारण्यात आलेल्या पेट्रोल पंपांना चांगला प्रतिसाद मिळत असून बाणेर येथील पेट्रोल पंपावर सीएनजी सेवा सुरू करण्यात आल्यामुळे निधीमध्ये अजून चांगली भर पडेल. पुढील काळात पोलीस दलालाही ई-वाहने देण्याचा प्रयत्न करणार असून इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरू करावी लागतील, असेही ते म्हणाले.

आताच्या स्पर्धेच्या युगात पोलीसांच्या पाल्यांनीही उत्कृष्ट गुण मिळवून पुढे आले पाहिजेत, ती कर्तबगार झाली पाहिजेत. फियाट कंपनीने दिलेली शिष्यवृत्ती पोलीस पाल्यांना उपयुक्त ठरेल. जिल्हास्तरावर ई-ऑफीस प्रणालीचा वापर करणारे पुणे ग्रामीण पोलीस पहिले कार्यालय ठरले असून ही बाब चांगली आहे, असेही श्री. पवार म्हणाले.

श्री. वळसे- पाटील म्हणाले, महाराष्ट्र पोलीस हे २ लाखांवर विशाल मनुष्यबळ असलेले पोलीस दल आहे. कोरोनाच्या काळामध्ये पोलीस दलाने स्वत:च्या जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता समाजाच्या सुरक्षिततेसाठी सेवा बजावली. सेवा बजावताना अनेक पोलीस कोरोनाला बळी पडले. त्यांच्यामागे शासन खंबीरपणे उभे राहीले. त्यांच्या कुटुंबियांना प्राधान्याने ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान, कुटुंबातील एका व्यक्तीला अनुकंपा तत्वा्यवर गतीने नोकरी देण्याची कार्यवाही करण्यात आली.

पोलीस दलात शिपाईपदावर भरती झालेल्यास पदोन्नतीने पोलीस उपनिरीक्षक पदावर जाण्याची संधी मिळावी यासाठी महत्वायाचा निर्णय शासनाने घेतला. पोलीसांच्या आरोग्य योजनेमध्ये सध्याच्या ३९ आजारात नव्याने १९ आजारांचा समावेश करण्यात आला आहे. पोलीसांच्या घरांसाठी गृहबांधणी अग्रीमाबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

कोणतीही विपरीत परिस्थिती आली तरी गृहमंत्री म्हणून महाराष्ट्र पोलीसांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू अशी ग्वाही देऊन पोलीसांनी जनतेला चांगली कायदा व सुव्यवस्था द्यावी. त्यामध्ये तडजोड केली जाणार नाही, असेही गृहमंत्री म्हणाले.

फक्त इमारत बांधकाम करण्यापेक्षा विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवणे महत्वाचे असून त्यासाठी वेळीच आर्थिक मदत देणे गरजेचे असते. फियाट कंपनीने दिलेली शिष्यवृत्ती त्यासाठी उपयुक्त ठरेली असेही ते म्हणाले.

यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी प्रास्ताविकात माहिती दिली, डायल ११२ साठी जिल्हा नियोजन समितीने दिलेल्या १ कोटी रुपयांतून १० चारचाकी व १२ दुचाकी वाहने घेण्यात आली आहेत. पोलीस कल्याण निधीतून सुरू करण्यात आलेल्या पेट्रोल पंपातून १ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. जिल्ह्यात १६ पोलीस ठाण्यांच्या नवीन इमारतींचे बांधकाम सुरू आहे. फियाट इंडियाने आतापर्यंत १४७ विद्यार्थ्यांना ८१ लाख रुपयांची शिष्यवृत्तीची रक्कम दिली आहे. नूतनीकरण करण्यात आलेले भिमाशंकर सांस्कृतिक भवन पोलीस कुटुंबांच्या विवाह, वाढदिवस तसेच अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अल्प दराने देण्यात येते, असेही ते म्हणाले.

यावेळी जिल्हा ग्रामीण पोलीस दलाने अवलंबलेल्या ई-ऑफीस प्रणाली तसेच पोलीस कल्याण निधीतून चालवण्यात येणाऱ्या बाणेर पेट्रोलपंपामध्ये उभारण्यात आलेल्या सीएनजी स्टेशनचे ई-उद्घाटनही करण्यात आले. फियाट कंपनीच्यावतीने सीएसआर निधीअंतर्गत पोलीस पाल्यांना शिष्यवृत्यांच्या धनादेशाचे वितरणही यावेळी करण्यात आले.

यावेळी श्री. गोगिया यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, डॉ. मितेश घट्टे यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी, पोलीस पाल्य उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.