Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- नारायण राणे यांना भाजपमध्ये ‘अच्छे दिन’.
- अमित शहा यांनी दिलेला शब्द पाळला.
- राणेंना मंत्रिपद देण्यामागे भाजपची अनेक गणितं.
वाचा: शिवसैनिक ते केंद्रीय मंत्री; ‘असा’ आहे नारायण राणे यांचा थक्क करणारा प्रवास
नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात उभारलेल्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनासाठी ७ फेब्रुवारी रोजी अमित शहा आले होते. यावेळी बोलताना शहा यांनी राणे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले होते. शिवसेनेवर तोफ डागतानाच शहा यांनी राणे यांच्या आव्हानात्मक राजकीय प्रवसावरही भाष्य केले होते. नारायण राणे हे अन्यायाविरुद्ध लढणारे आणि घट्ट पाय रोवून उभे राहणारे नेते आहेत. अन्याय होत असेल तर ते कोणताही विचार न करता त्याचा प्रतिकार करतात. या कारणामुळेच त्यांची आतापर्यंतची वाटचाल वळणावळणाची राहिली आहे. मात्र, भाजपमध्ये त्यांच्याबाबतीत असं होणार नाही. त्यांचा भाजपात आदर आणि सन्मानच होईल. त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची ग्वाही मी देत आहे, असे अमित शहा म्हणाले होते. या वक्तव्यातून शहा यांनी एकप्रकारे राणे यांना मानाचं पद देण्याचेच संकेत दिले होते. त्यामुळे आज राणे यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली असताना त्यामागे कुठेतरी अमित शहा असल्याचे बोलले जात आहे.
वाचा:राणे कॅबिनेट मंत्री, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात १५ कॅबिनेट, २८ राज्यमंत्र्यांना शपथ
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र नितेश आणि निलेश अनेक आघाड्यांवर किल्ला लढवताना दिसले आहेत. त्यात भाजपशी काडीमोड घेणाऱ्या शिवसेनेशी राणे कुटुंब थेट पंगा घेत आहे. कोकणापासून मुंबईपर्यंत ही टक्कर पाहायला मिळत आहे. त्यातच काही महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राणे यांची साथ मिळाल्याने कोकणात भाजपचा यशाचा ग्राफही उंचावला आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात फारसा प्रभाव पाडू न शकलेल्या भाजपला राणेंमुळे नवीन उभारी मिळाल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. कोकणात भाजपला मिळालेल्या या यशाची केंद्रीय नेतृत्वाकडून दखल घेण्यात आली होती. त्यामुळेच महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय स्थितीत राणेंसारख्या आक्रमक नेत्याला बळ देण्याची राजकीय चाल भाजपने खेळल्याचे बोलले जात आहे. राज्यात सध्या देवेंद्र फडणवीस सोडले तर भाजपकडे प्रभावी आणि आक्रमक नेतृत्व नाही. त्यामुळेही राणेंच्या आक्रमकतेला सत्तेची जोड दिल्यास त्याचा पक्षाला फायदा होईल. शिवसेनेपुढे पर्यायाने महाविकास आघाडीपुढे तगडे आव्हान उभे करण्यासाठीही उपयोग होईल, अशी अनेक गणितं डोक्यात ठेवून भाजपने राणेंच्या पदरात मंत्रिपद टाकलं आहे. राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागावी म्हणून शहा आणि फडणवीस यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आग्रह होता, असेही सांगण्यात येत आहे.
वाचा: शिवसेनेचा ‘हा’ बालेकिल्ला काबीज करण्यासाठी नारायण राणेंना बळ