Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुणे दि.२८- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना द्यावयाचा लाभ सहजरित्या अदा करता यावा म्हणून केंद्र शासनाने योजनेच्या लाभार्थ्यांनी त्यांची ओळख पडताळणी (ई-केवायसी) पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने ३१ जुलै २०२२ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबीयास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये) २ हजार रुपये प्रती हप्ता या प्रमाणे ३ हप्त्यात ६००० रुपये प्रती वर्षी लाभ त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येत आहे. आज अखेर या योजने अंतर्गत राज्यातील १ कोटी ९ लाख ४६ हजार लाभार्थ्यांना एकूण १८ हजार १५१ कोटी ७० लाख रुपये लाभ अदा करण्यात आलेला आहे.
लाभार्थ्यास स्वतः पीएम किसान पोर्टलवर https://pmkisan.gov.in/ या लिंक आधारे किंवा सामाईक सुविधा केंद्रामार्फत ई-केवायसी पडताळणी करण्याच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या दोनपैकी स्वत:च्या सोईनुसार एका सुविधेच्या आधारे लाभार्थ्यास त्याची ई-केवायसी पडताळणी करता येईल. यापूर्वी ई-केवायसी ३१ मे २०२२ पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
पीएम किसान पोर्टलवरील लिंकद्वारे लाभार्थ्यास त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न केलेल्या मोबाईलवर येणाऱ्या ओटीपीच्या आधारे स्वत:ची ई-केवायसी पडताळणी करता येईल. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यासाठी सामाईक सुविधा केंद्राकडून रक्कम १५ रुपये प्रती लाभार्थी शुल्क आकारण्यात येईल.
राज्यात २६ मे २०२२ अखेर एकुण ५२ लाख ८२ हजार लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरीत लाभार्थ्यांनी स्वत: अथवा सामाईक सुविधा केंद्रच्या माध्यमातून त्यांची ई-केवायसी पडताळणी केंद्र शासनाने दिलेल्या ३१ जुलै २०२२ च्या मुदतीपूर्वी पूर्ण करावी, असे आवाहन उपआयुक्त (कृषि गणना) तथा पथक प्रमुख, पी.एम.किसान विनयकुमार आवटे यांनी केले आहे.