Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग’- सृजन फाउंडेशन आणि नांदेड सिटी आयोजित ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाची सांगता

9

पुणे,दि.०६ : – शास्त्रीय, उपशास्त्रीय रचनांनी रंगलेली मैफल, व्हायोलिन-बासरीची चित्तवेधक जुगलबंदी अन्‌‍ ‘अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग’ या अभंगाने रसिकांच्या मनाचा घेतलेला ठाव असा त्रिवेणी संगम जुळून आला तो सृजन फाउंडेशन आणि नांदेड सिटी आयोजित ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवात. दोन वर्षांनंतर आयोजित केल्या गेलेल्या या स्वरोत्सवाला रसिकांच्या भरभरुन मिळालेल्या प्रतिसादाने कलावंतही सुखावले.
गायन-वादनाचा मिलाफ, युवा प्रतिभावान आणि प्रतिथयश कलाकारांचा सहभाग असलेल्या स्वरोत्सवाचे आयोजन टिळक स्मारक मंदिरात करण्यात आले होते. दोन दिवसीय स्वरोत्सवाची सांगता आग्रा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या गायनाने झाला. तरंगिणी प्रतिष्ठानचे पं. शौनक अभिषेकी, स्व. ज्योत्स्ना भोळे यांच्या कन्या वंदना खांडेकर, सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश पायगुडे, विश्वस्त अधीश पायगुडे, कार्याध्यक्ष पोपटलाल शिंगवी, कोषाध्यक्ष रामचंद्र शेटे यांनी या महोत्सवाचे आयोजन केले होते.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात युवा गायिका डॉ. कस्तुरी पायगुडे-राणे यांच्या गायनाने झाली. राग श्यामकल्याण मधील ‘सो जारे राजा’ ही झपतालातील रचना त्यांनी सुरुवातीस सादर केली. त्यानंतर मध्यलयीतील रचना आणि त्यानंतर तराना सादर करून रसिकांची दाद मिळवली. ‘आओ सब सखी’ हा झुला सादर केल्यानंतर ‘बोलावा विठ्ठल’ या अभंगाने मैफलीचा समारोप केला. उमेश पुरोहित (हार्मोनियम), गणेश तानवडे (तबला), माउली टाकळकर (टाळ), प्रियंका पांडे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
तेजस उपाध्ये यांच्या व्हायोलिन आणि सौरभ वर्तक यांच्या बासरी वादनाच्या जुगलबंदीने मैफलीत रंगत आली. उन्मेश बॅनर्जी यांनी समर्पक तबलासाथ केली.
स्वरोत्सवाची सांगता विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या मैफलीने झाली. त्यांनी आपल्या सादरीकरणाची सुरुवात राग बागेश्रीमधील ‘कोन गत भई मोरी’ या विलंबीत तीनतालातील बंदिशीने केली. पंडित नाथराव नेरळकर यांची पंचम सवारी तालातील ‘जाओ सैय्या जाओ’ ही रचना सादर करुन गुरुंना वंदन केले. ‘काहे खेलत शाम डगरिया’ या साडेतीन मात्रेतील भैरवीने त्यांनी मैफलीची सांगता केली. त्यांना चैतन्य कुंटे (हार्मोनियम), प्रशांत पांडव (तबला), ज्ञानेश्वर दुधाणे (पखवाज), माउली टाकळकर (टाळ), अनुराधा मंडलिक, स्वरूपा बर्वे (सहगायन) यांनी समर्पक साथ केली. मैफलीचे निवेदन रवींद्र खरे यांनी केले.
उद्योजक अतुल जेठमलानी यांचा विशेष सत्कार पंडित शौनक अभिषेकी यांच्या हस्ते करण्यात आला. कलाकारांचा सत्कार वंदना खांडेकर, पंडित शौनक अभिषेकी, प्रकाश पायगुडे यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.