Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

रिक्त पदांच्या भरतीसोबत उद्योग क्षेत्रातही मोठ

5

पुणे, दि.३ : राज्यात शासकीय स्तरावर ७५ हजार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबत उद्योग क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण आणि छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित विभागीय रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार, बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, कोल्हापूरचे परेश भागवत आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, राज्यातील युवकांना रोजगार देण्यासाठी रिक्त पदे भरण्यासोबत आवश्यक नवी पदे निर्माण करण्याच्या सूचना विविध विभागांना देण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात एकाचवेळी ६ ठिकाणी अशा स्वरूपाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील २ हजार ३३ उमेदवारांना आज नियुक्ती पत्र देण्यात येत आहे.

बेरोजगारी दूर करणे, चांगले, अनुभवी, कुशल मनुष्यबळ प्रशासनात आणणे आणि या माध्यमातून राज्याच्या प्रगतीला गती देणे हा यामागचा उद्देश आहे. कायद्याची आणि शासनाच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची महत्त्वाची जबाबदारी प्रशासनाची आहे. नवनियुक्त उमेदवारांनी क्षमतेने काम करीत प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून नागरिकांना सेवा देण्याचे कार्य करावे, असे आवाहन  पाटील यांनी केले. उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया वेळेत पूर्ण केल्याबद्दल त्यांनी संबंधित विभागांचे अभिनंदन केले.

विभागीय आयुक्त . राव म्हणाले, राज्य शासनाने एका वर्षात ७५ हजार युवकांना रोजगार देण्याचा ‘महासंकल्प’ केला असून त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात पुणे विभागामध्ये ऊर्जा, परिवहन आणि ग्रामविकास विभागात एकूण ३१६ पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्राचे वितरण करण्यात येत आहे. नवनियुक्त उमेदवारांनी आपल्या विभागाला सर्वोच्च स्थान देऊन शासकीय सेवेत समर्पित भावनेने उत्कृष्ट काम करावे. निवड झालेल्या उमेदवारांनी आयुष्यातील हा ‘संकल्प दिवस’ समजून राज्याच्या प्रगतीला हातभार लावण्याचा संकल्प करावा असेही ते म्हणाले.

प्रादेशिक संचालक नाळे म्हणाले, राज्यातील युवकांना जास्तीत जास्त प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. उमेदवारांना निर्धारित वेळेत नियुक्ती देण्यासाठी महावितरणने मोहीम स्तरावर कागदपत्रांची छाननी केली. व्यक्तीने एखादा व्यवसाय केल्यास त्याची आर्थिक उन्नती होते, मात्र शासकीय सेवेत आल्यावर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासोबत देशसेवा घडत असते. नियुक्ती झालेल्या उमेदवारांवर अंधारलेल्या घरात प्रकाश पोहोचविण्याची जबाबदारी आहे. उद्योग क्षेत्राला तत्परतेने सेवा दिल्यास देशाच्या प्रगतीलाही हातभार लागणार असल्याने सर्वांनी पूर्ण क्षमतेने काम करावे.

यावेळी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते नवनियुक्त उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आले. पुणे विभागात ऊर्जा विभागाअंतर्गत पुणे वीज वितरण कंपनी ६०, कोल्हापूर वीज वितरण कंपनी १०४, बारामती वीज वितरण कंपनी १४३, पुणे वीज पारेषण कंपनी १ असे एकूण ३०८, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाअंतर्गत पुणे कार्यालयात ३ आणि कोल्हापूर जिल्हा परिषद येथे ५ असे एकूण ३१६ उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संदेश आणि मुंबईला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी दाखविण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.