Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुंबई, दि. २१ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ०९ व १७ जुलै २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा-२०२१ संयुक्त पेपर क्रमांक १ व पेपर क्रमांक २ पोलीस उपनिरीक्षक या संवर्गामधून शारीरिक चाचणीसाठी १५३५ उमेदवार पात्र ठरले. याबाबतचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेत अहंताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे, त्यांची पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, मुख्य परीक्षेच्या निकालाच्या आधारे शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक संवर्गात पदांची संख्या ३७६ असून शारीरीक चाचणीसाठी अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची संख्या १५३५ आहे.
या निकालाआधारे शारीरिक चाचणी व मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या व अर्जात प्राविण्यप्राप्त (गुणवत्ताधारक) खेळाडूचा दावा केलेल्या उमेदवारांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार तसेच त्यास अनुसरुन प्रसिध्द करण्यात आलेल्या शुध्दिपत्रकातील तरतुदीनुसार अराजपत्रित गट-ब पदाकरिता त्यांचे क्रीडा विषयक प्रमाणपत्र वैध ठरते किंवा कसे याच्या पडताळणीकरीता सदर प्रमाणपत्र संबंधित विभागीय क्रीडा उपसंचालकांकडे पूर्व परीक्षेचा अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांक १९ नोव्हेंबर, २०२१ या अंतिम दिनांकास किंवा तत्पूर्वी सादर केल्याची पोचपावती, त्या दिनांकाचे किंवा तत्पूर्वीचे संबंधित क्रीडा प्रमाणपत्र व सदर क्रीडा विषयक प्रमाणपत्र गट-ब पदाकरिता वैध ठरत असल्याबाबतचा संबंधित विभागीय क्रीडा उपसंचालकांचा क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल मुलाखतीच्या वेळेस सादर करणे अनिवार्य राहणार आहे.
पोलीस उपनिरीक्षक पदाचा शारीरिक चाचणी व मुलाखत कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर त्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावरुन स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.
शारीरिक चाचणी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे घेण्यात येईल. याबाबतचा सविस्तर तपशील स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निकालातील अर्हताप्राप्त न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे, अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक असल्याचे लोकसेवा आयोगाचे परिक्षोत्तर उपसचिव (अप) यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.