Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
चंद्रपूर, दि. 28 : जिल्ह्याच्या प्रगतीसाठी रस्ते महत्त्वपूर्ण असून चंद्रपूर जिल्ह्यात प्रलंबित रस्त्याची कामे उच्च गुणवत्ता राखून करावीत. यात कोणतीही तडजोड होता कामा नये. विशेष म्हणजे गुणवत्तेबाबत कोणाच्याही दबावाला बळी न पडता ही कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
नियोजन भवन येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचा आढावा घेताना ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, अनंत भास्करवार व पूनम वर्मा (विद्युत), तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे व संध्या गुरनुले, चंदनसिंह चंदेल, रामपालसिंग प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्ह्यात कामे अर्धवट राहता कामा नये, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, रस्त्यांची गुणवत्ता उच्च दर्जाची असावी. शिवाय काम वेगाने पूर्ण झाल्यास नागरिकांना देखील दिलासा मिळतो. जिल्ह्यातील अनेक कामे अद्याप का पूर्ण झाली नाही, यामागील कारणांची पालकमंत्री मुनगंटीवार यांनी विचारणा केली. या कामांचे कार्यादेश, कामाची मुदत, विलंबासाठी किती दंड आकारावा लागतो, याबाबत माहिती सादर करण्याचे निर्देश त्यांनी सा. बां. विभागाला दिले.
रस्ते व पुलांच्या एकूण 443 कोटींच्या 21 कामांपैकी 8 कामे पूर्ण असून 13 कामे प्रगतीपथावर आहेत. पुलाच्या ॲप्रोच रस्त्याची कामे पूर्ण करून घेण्यासाठी तसेच जिल्ह्यात मंजूर असलेल्या तत्वत: घोषित 115 कि.मी.च्या राष्ट्रीय महामार्गाची प्रलंबित कामे लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. याबाबत लवकरच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक घेण्यात येईल. पोंभुर्णा येथे न्यायालय मंजूर झाले आहे, त्यासाठी इमारतीची जागा मंजूर करून घेण्यासाठी पाठपुरावा करावा.
मूल तालुक्यात विश्रामगृह, भाजी बाजार, आदिवासी वस्तीगृह, बायपास रस्ता, बस स्थानक, पोलीस उपविभागीय कार्यालयासाठी जागा, राजोली प्राथमिक आरोग्य केंद्र आदींचा त्यांनी आढावा घेवून कामे मार्गी लावण्यासाठी मूल उपविभागाची वेगळी आढावा बैठक घेण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. चंद्रपूर, मूल व बल्लारपूर व गोंडपिपरी शहरांसाठी बायपास रोड आवश्यक आहे. यासाठी आवश्यक जागानिश्चिती करावी. खाणक्षेत्रात जड वाहतुकीचे प्रमाण जास्त असलेल्या रस्त्यांची ओळख पटवून तेथे बायपास रस्ते प्रस्तावित करता येतील का याचा देखील अभ्यास करावा. तसेच घुग्गुस बायपास रस्त्याचा प्रलंबित प्रश्न देखील तातडीने निकाली काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
चंद्रपूर जिल्ह्यातील अपघात कमी व्हावे यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. नुकतेच बल्लारपुर येथे रेल्वे पादचारी पुल कोसळून अपघात घडला आहे. या पार्श्वभूमीवर वर्धा नदीवरील पुलाची तसेच जुन्या पुलांची तपासणी करून घ्यावी. बिओटी तत्वावरील रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची कामे विहित मापदंडानुसार होत आहेत का, कराराप्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली आहेत का, रफनेस इंडेक्स पडताळणी होते का, याबाबत देखील तपासणी करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे, जिल्हानिहाय रस्त्याचा दर्जा व लांबीचा तपशील, खड्डे भरणे कामे, भांडवली खर्चातील मार्ग व पूलाची कामे, अर्थसंकल्पीय रस्ते व पुलाचे कामे, हायब्रीड ॲन्युटी अंतर्गत कामे, नाबार्डची कामे, नक्षलग्रस्त भागातील अंतर्गत रस्त्यांची कामे, पुरवणी अर्थसंकल्पातील रस्ते परिरक्षण व दुरुस्तीची कामे, इमारतीची कामे, नाविण्यपूर्ण कामे, वन अकॅडमी, महाकाली मंदिर, परिसराचा विकास कामे, सैनिकी शाळा, बॉटनिकल गार्डन विसापूर, बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्र, चिचपल्ली सिकलसेल इमारत, जिल्हाधिकारी कार्यालयाचे बांधकाम याबाबत बैठकीत आढावा घेतला.
चंद्रपूर जिल्ह्यात 127 कि.मी. प्रमुख राज्यमार्ग, 569 कि.मी. राज्यमार्ग व 2420 कि.मी. प्रमुख जिल्हामार्ग आहेत. तसेच 473 कि.मी. राष्ट्रीय महामार्ग व 115 कि.मी. तत्वत: घोषित राष्ट्रीय महामार्ग आहेत. जिल्ह्यात रेल्वे सुरक्षेच्या सहा कामांपैकी चार कामे सुरू असून दोन कामे अद्याप सुरू झालेली नाही. तसेच राज्यमार्गाच्या 99 कामांपैकी 31 कामे पूर्ण झाली. तर 51 कामे प्रगतीपथावर आणि 17 कामे अद्याप सुरू झाली नाहीत. जिल्हा रस्त्याची 347 पैकी 115 कामे पूर्ण 139 प्रगतीपथावर तर 93 कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. नाबार्डची 22 पैकी 8 पूर्ण व 14 प्रगतीपथावर तसेच हायब्रीड ॲन्यूईटीची 36 पैकी 29 कामे प्रगतीपथावर व 7 कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. एकूण 8 हजार कोटींच्या 510 कामांपैकी 154 कामे पूर्ण झाली आहेत तर 237 कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
०००